अर्थपूर्ण प्रकारामुळे गुन्ह्यातून सराफाला जाते वगळले
… तर बसू शकेल दागिने चोरीच्या घटनांना आळा
जळगाव- चोरी करणारा चोरा प्रमाणेच चोरीचे सोने घेणाराही तेवढाचा गुन्हेगार आहे. मात्र दागिने लुटीच्या तसेच चोरीच्या गुन्ह्यात आरोपीने ज्या सराफाकाकडे सोने विकले व पैसे घेतले, त्या सराफाला पोलीसच अर्थपूर्ण व्यवहारातून गुन्ह्यातून वगळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चोरीचे सोने घेणार्या सराफांची हिंमत दिवसेंदिवस वाढत असल्याची शोकांतिका आहे. चोरीचे सोने घेणार्या सराफांवर जर कारवाई झाली तर कदाचित दागिणे चोरीच्या घटनांना आळा बसू शकेल, असे बोलले जात आहे.
चोरटे असे लावताहेत दागिन्यांची विल्हेवाट
दागिने चोरी नंतर चोरही हुशारीने ज्या जिल्ह्यात किंवा शहरात चोरी केली त्याठिकाणचे चोरी केलेले सोने दुसर्या जिल्ह्यात विक्रि करतात. हे करत असताना ते रुग्णालयात नातेवाईक आजारी असल्याचे सांगून अर्जंट पैशांची आवश्यकता आहे, असे सराफाला भासवतात. सराफाकडून मिळेल त्या पैशांतून मजा मारतात. त्याचप्रमाणे दुसर्या जिल्ह्यात चोरी केलेले सोने जळगावातील सराफाबाजारात काही सराफ खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे. यात काहींना प्रामाणिकपणे सोने चोरीचे आहे किंवा नाही हे माहित नसते, मात्र काही सराफ चोरीचे असल्याचे माहित असूनही दागिने खरेदी क रत असल्याची माहिती मिळाली आहे.
गुन्ह्यातून असे वगळले जातात सराफ
दागिने चोरीच्या घटनांमध्ये तपासधिकार्याने ठरविले तर तो आरोपीकडून चोरीचे सोने घेणार्या सराफालाही आरोपी करु शकतो. मात्र यात चिरीमिरीसारखा प्रकार होवून सोयीस्करपणे सराफाला गुन्ह्यातून वगळले जात असल्याची चर्चा आहे. याबाबत काही विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचार्यांना विचारणा केली असता त्यांनीही याला नाव छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला. तसेच कायद्यात कलमही असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. मात्र काही प्रामाणिक अधिकार्यांनी सराफांना आरोपी केल्याचेही गेल्या काळातील घटनांवरुन लक्षात येते.
बील,पावती नसतानाही घेतले जाते सोने
एखाद्या सोने व्यावसायिकाकडे जर आपण त्याच्याकडे घेतलेले सोने मोडण्यासाठी गेलो तर तो तिचे संपूर्ण बिल मागतो. यानंतर तोलून मापून अतिशय बारीक पध्दतीने निरखून घेतो. मग विना पावती, बिल किंवा ओळखीचा पुरावा न घेता सराफांकडून सोने घेतलेच कसे जाते? हा प्रश्न आहे. काही सराफ कमी किमतीत जर उत्तम दर्जाचे सोने मिळत असेल, तर सर्व गोष्टींकडे कानाडोळा करताहेत.
(क्रमशः)