टिटवाळा । मितेश जगताप या तरुणाने 6 महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला होता. याप्रकरणी 21 फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असून त्याआधीच प्रकरण न्यायालयातून मागे घेण्यासाठी मितेशच्या कुटुंबीयांना दुसर्यांदा धमकीचे पत्र आले आहे. मृत मितेशने टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल न केल्याने या कुटुंबीयांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मितेशच्या कुटुंबीयांना यापूर्वीही एक पत्र आले होते. त्या पत्रात पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी दिली होती.
या दुसर्या धमकीच्या पत्रातही 21 फेब्रुवारी या तारखेपूर्वी त्या चार पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, नाहीतर अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम कधी ठेवायचा ते ठरावा, अशी धमकी देण्यात आली आहे. दुसर्यांदा आलेल्या निनावी पत्रामुळे जगताप कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कुटुंबीयांना ही केस मागे घेण्यासाठी निनावी पत्राद्वारे धमकीचा दुसर्यांदा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मयत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केला आहे. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, नाही तर आम्ही आझाद मैदानात उपोषण करू. मंत्रालयाच्या दारात जाऊन आत्महत्या करणे हाच पर्याय आमच्याकडे उरला आहे, असे पुष्पा जगताप यांनी पत्रकारांना सांगितले तसेच हे पत्र ग्रामीण पोलिसांचा शिक्का असलेल्या खाकी पाकिटात आले आहे. यापूर्वीच्या निवानी पत्रावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रात केलेल्या धमकीचा उल्लेख
एवढे समजवूनदेखील तुम्हाला समजत नाही. या प्रकरणात उगाच तुम्ही चार जणांना अडकवत आहात. तुम्हाला केवढी किंमत पाहिजे तेवढी घ्या. पण त्या चौघांना सोडून द्या. जे काही घडले ते नक्कीच चुकीचे घडले. ते काही बदलता येणार नाही. तुम्हाला हटवण्यासाठी रक्कमही देण्यात आली. तुम्हाला तुमच्या मुलाकडे पाठवण्याचे नक्की ठरेल. अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम कधी ठेवायचा ते ठरावा. सात दिवसाची वेळ बाकी आहे. नीट विचार करा. आम्ही तुम्हाला योग्य सल्ला देत आहोत. असे दुसर्यांदा आलेल्या निवानी धमकीच्या पत्रात नमूद केले आहे. या निवानी पत्र पाठणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धमकीचे पत्र
दरम्यान, यापूर्वीही जगताप कुटुंबीयांना धमकीचे निवानी पत्र आले होते. त्यामध्ये पोलीस जेवढे पैसे देतात, तेवढे पैसे घेऊन गप्प बसा. पैसे कमी असतील तर सांगा, जास्त पैसे मिळतील, त्यातच तुमचे भले आहे. तक्रारदारच राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा, आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काही दिवस तुमच्या हातात आहेत, काळजी घ्या. अशी धमकी आधीच्या पत्रात देण्यात आली होती. याप्रकरणी तपास अधिकारी डीवायएसपी विशाल ठाकूर यांच्याशी संपर्क असता, हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने याबद्दल बोलणे उचित नसून, याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलावे लागेल असे ते म्हणाले.