ठाणे । न्यायालयातून दावा मागे घेण्यासाठी मितेशच्या कुटुंबीयांना तिसर्यांदा धमकीचे पत्र आले आहे. त्यामुळे जगताप कुटुंब भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत. ऑटोमोबाईल अभियंता असलेल्या 21 वर्षीय मितेश जगतापने 23 ऑगस्ट 2017 ला आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला होता. टिटवाळ्यातील पोलिसांच्या जाचाला कंटाळून मितेशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल न केल्याने अखेर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गंभीर दखल घेत डिसेंबर महिन्यात टिटवाळा पोलिसांना चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी मितेशच्या कुटुंबीयांना यापूर्वीही एक पत्र आले होते. त्याही पत्रात पोलिसांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जगताप कुटुंबीयांना धमकी दिली होती. दुसर्या धमकीच्या पत्रात तर 21 फेब्रुवारी रोजी कल्याण न्यायालयात तारीख आहे. या तारखेपूर्वी त्या चार पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, नाहीतर अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम कधी ठेवायचा ते ठरावा. आता पुन्हा तिसर्यांदा आलेल्या पत्राने जगताप कुटुंब पूर्णतः खचून गेल्याचे पाहवयास मिळाले.
या प्रकरणातील दोषी पोलिसांविरोधात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात तारीख आहे. त्यामुळे न्यायालयात जावून ही केस मागे घेण्यासाठी निनावी पत्राद्वारे तिसर्यांदा धमकीचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप मृत मितेशची आई पुष्पा जगताप यांनी केला. न्यायालयाने दोषी आरोपींना कडक शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मंत्रालयाच्या दारात जावून आत्महत्या करू, हाच आमच्याकडे पर्याय उरला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्र हे डोंबिवलीच्या पत्त्यावर पाठविण्यात आले. मात्र यापूर्वीच्या निनानी आलेल्या पत्रावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी तपास अधिकारी डीवायएसपी विशाल ठाकूर म्हणाले, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबद्दल बोलणे उचित होणार नाही. याबाबत पोलीस अधिक्षकांशी बोलावे लागेल.
नेमके प्रकरण काय ?
ऑटोमोबाईल इंजिनियर असलेल्या मितेशने 23 ऑगस्ट 2017ला आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 20 ऑगस्ट 2017 ला मध्यरात्री मितेश टिटवाळ्यात मोटारसायकलवर फिरत होता. मात्र मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. घरच्यांनी गाडीची कागदपत्रे आणून दाखवल्यावर त्याला सोडण्यात आले. मात्र त्याचा मोबाईल पोलिसांकडे होता. हा मोबाईल देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. तसेच मितेशला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप मितेशच्या कुटुंबीयांना केला. यातूनच मितेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला पोलीसच जबाबदार असल्याचा जगताप कुटुंबाचा आरोप आहे.
यापूर्वीही जगताप कुटुंबीयांना धमकीचे निवानी पत्र आले होते. त्यामध्ये पोलीस जेवढे पैसे देतात तेवढे पैसे घेवून गप्प बसा. पैसे कमी असतील तर सांगा जास्त पैसे मिळतील, त्यात तुमचे भले आहे. तक्रारदार राहिले नाहीत तर केस रद्द होईल. बघा विचार करा, आता फक्त गोडीत समज देतो. नंतर मात्र सर्व काही हातून जाईल. काळजी घ्या, अशा आशयाचे धमकी वजा निनावी पत्र अज्ञात व्यक्तीने लिहिले आहे. त्यावेळीही याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.