पोलिसांसमक्ष झाडे बोडकी

0

भुसावळ । एकीकडे शासन वृक्षलागवड व संवर्धनासाठी जनजागृती करुन झाडांची संख्या वाढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नव्याने वृक्ष लागवड करणे तर सोडाच मात्र आहे त्या वृक्षांचे देखील संवर्धन केले जात नाही. उपविभागीय कार्यालय व शहर पोलीस स्टेशनला लागून असलेल्या दूध संघाच्या कार्यालयासमोरील हिरव्यागार कडूनिंबाच्या झाडासह इतर दोन झाडांच्या मोठ – मोठ्या फांद्या तोडण्यात येऊन त्यांना पूर्णपणे बोडके करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस कर्मचार्‍यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडत असताना देखील याबाबत कुणीही हस्तक्षेप केला नाही. येथील प्रांताधिकारी कार्यालय व शहर पोलीस स्थानकाला लागून काही मोठ मोठी झाडे आहेत या झाडांच्या फांद्या या दुय्यम कारागृहाच्या वर लोंबकळल्या असल्यामुळेे याठिकाणी वार्‍यामुळे फांद्या कोसळल्यास जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे खबरदारी म्हणून दुय्यम कारागृह निरीक्षक माळी यांनी याबाबत केवळ कारागृहावर लोंबकळणार्‍या झाडाच्या फांद्या छाटण्याची परवानगी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती.

पालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या परवानगी पत्रावर एक चिंच व दोन पिंपळाचे झाड पुर्णपणे काढण्याची परवानगी दिली असल्याने हस्ताक्षरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन याप्रकारे झाड तोडण्याची परवानगी कशी देऊ शकते असा प्रश्‍न उपस्थित राहतो.

ठेकेदाराने तोडले झाड
यासंदर्भात अर्ज दिल्यानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी याची पाहणी करुन फांद्या छाटण्याची परवानगी देण्यात आली. मात्र ज्या व्यक्तीला फांद्या तोडण्याचे काम देण्यात आले होते त्यांनी या झाडाच्या धोकादायक फांद्याच न छाटता अर्धे अधिक झाडच छाटून पुर्णत: बोडके केले आहे. येथील कडूनिंबासह तीन झाडांची छाटण करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस स्थानकाला लागूनच हि झाडे असल्याने येथून पोलीस कर्मचार्‍यांचा राबत आहे. सर्वांच्या समोर या झाडांच्या पुर्ण फांद्या छाटण्यात येत होत्या तरी देखील कुणीही याला आळा घातला नाही. तसेच पालिका कर्मचार्‍यांची देखील याठिकाणी उपस्थिती दिसून आलेली नाही. त्यामुळे प्रशासन व पोलीसांची उदासिनता यातून दिसून येत आहे. अशा धोरणामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्‍हास होत असून झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. दिवसेंदिवस झाडे तोड वाढत आहे. यासंदर्भात प्रशासनाने या तोडलेल्या झाडांचा पंचनामा करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

काही झाडांच्या फांद्या या कारागृहावर झुकलेल्या होत्या, कारागृहावर झुकलेल्या फांद्यांमुळे सुरक्षेचा धोका उद्भवू शकत होता. वार्‍यामुळे या फांद्या कोसळून जिवीत तसेच वित्तहानी होण्याची शक्यता असल्यामुळे पालिकेकडे फांद्या तोडण्याची परवानगी मागितली होती त्यानुसार पालिका कर्मचार्‍यांनी येऊन पाहणी केल्यानंतर परवानगी देण्यात आली. – जितेंद्र माळी, कारागृह अधिक्षक

पालिका प्रशासनातर्फे कुणालाही झाड तोडण्याची परवानगी देण्यात येत नाही, केवळ झाडाच्या फांद्या अडथळा ठरत असतील तर त्या फांद्या छाटण्याची परवानगी दिली जाते. कारागृहालगतच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी मागण्यात आलेली होती. त्यामुळे केवळ फांद्याच छाटण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित व्यक्तीने जर जास्तीच्या फांद्या कापल्या असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. – बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी