पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण करत आरडाओरड करुन घातला गोंधळ

0

शहर पोलीस ठाण्यातील प्रकार: विवाहितेसह कुटुंबियांविरोधात दंगलीचा गुन्हा

जळगाव– न्यायालयीन कामकाजासाठी जळगावात आलेल्या चाळीसगाव येथील विवाहितेसह तिच्या कुटुंबियांनी पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्‍यांसमोर तरुणाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात घडली. मारहाण होत असलेल्या तरुणाची पोलिसांनी सुटका केल्यावर विवाहितेसह कुटुंबियांनी उलट पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप करत आरडाओरड केली व गोंधळ घातला. याप्रकरणी विवाहितेसह तिचे पती, सासरे व आई, वडील, भाऊ, बहिण अशा एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगाव येथील रश्मी हिचा साडेतीन वर्षापूर्वी रिंगरोडवरील विशाल उत्तम सोनवणे याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तीन महिने उलटत नाही तोच पतीसह सासरे, जेठ तुषार सोनवणे यांनी माहेरुन दहा लाख रुपये आणण्याच्या मागण्यासाठी छळ केला. या विरोधात रश्मी यांनी जिल्हापेठ पोलिसात व यानंतर महिला दक्षता समितीकडे तक्रार केली. महिला दक्षता येथे सुनावणीअंती याप्रकरणावर चाळीसगाव येथील न्यायालयात कामकाज सुरु आहे. याउलट पती विशाल सोनवणे यांनी रश्मीसह तिचे वडील, आई यांनी शिवीगाळ तसेच मारहाण केल्याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यावर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु आहे.

विवाहितेसह कुटुंबियाविरोधात दंगलीचा गुन्हा

पतीने तक्रार दाखल केली असल्याने त्यावर शुक्रवारी कामकामासाठी रश्मी तिचे वडील, आई, बीएसएफ जवान असलेला भाऊ तसेच बहिण हे जळगाव जिल्हा न्यायालयात आले. याठिकाणी पती विशाल तसेच उत्तम दिपचंद सोनवणे यांना शिवीगाळ झाली. याप्रकरणी विशाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पत्नी रश्मी सोनवणे, रमेश चिंतामण जाधव, सुशील रमेश जाधव, रोहित रमेश जाधव, जयश्री रमेश जाधव या पाच जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरचे, माहेरच्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल

तक्रार देण्यासाठी विशाल वडीलांसह शहर पोलीस ठाण्यात आला. त्यांची तक्रार घेत असतांना विवाहितेसह तिचे कुटुंबिय शहर पोलीस ठाण्यात धडकले. याठिकाणी विवाहितेने तिच्या वडीलांना पतीने माझे मागे गुंडे लावले असून त्यापैकी एक मुलगा पोलीस स्टेशनला आले असल्याचे सांगितले. हे एैकताच विवाहितेच्या वडीलांना शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तरुणाला चापटांनी मारहाण केली. पोलीस निरिक्षकांसह, गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांनी तरुणाची सुटका करुन विवाहितेसह तिच्या कुटुंबियाला बाजूला केले. उलट विवाहिता रश्मी हिच्यासह कुटुंबियांनी आम्हाला पोलिसांनी धक्काबुक्की तसेच अरेरावी केली, असा आरोप करत गोंधळ घातला व आरडाओरड करत पोलीस ठाणे आवारात गर्दी जमविली. याप्रकरणी उत्तम दिपचंद सोनवणे, विशाल उत्तम सोनवणे, रश्मी विशाल सोनवणे, रोहित रमेश जाधव, रमेश चिंतामण जाधव, सुशीला जाधव, जयश्री जाधव या सर्वांविरोधात पोलिसांसमोर मारहाण तसेच गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.