पोलिसाची कॉलर पकडून धमकी ; ‘चिंग्या’ला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

0

खूनाच्या गुन्ह्यात आधीच भोगतोय जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : शहर पोलीस स्टेशनला पहारा डयूटीवरील पोलीस कर्मचारी पुरूषोत्तम सुपडू लोहार हे वर्दीवर असताना कॉलर पकडून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात चिंग्या उर्फ चेतन आळंदे (34) याला सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन कलमात तीन वर्ष तसेच एक वर्ष अशी सक्तमजूरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर चिंग्या याने न्यायालयात गोंधळ घातला होता. अंडापाव विक्रेता चंद्रकांत उर्फ भैय्या सुरेश पाटील यांच्या खून खटल्यात चिंग्याला यापूर्वी जन्मठेपे झाली असून नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत आहे.

संशयिताला भेटू न दिल्याचा राग

दि. 04 जुलै 2014 रोजी पोलीस हवालदार पुरूषोत्तम लोहार हे शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे पहारा डयूटीवर होते. त्यावेळी विविध पोलीस स्टेशनचे एकूण 07 संशयीत शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होते. त्यांच्यावर लोहार हे पहारा डयुटी करत होते. दरम्यान रात्री 10.10 वाजेच्या सुमारास चिंग्या उर्फ चेतन त्याठिकाणी येऊन हवालदार लोहार यांना म्हणाला , मला लॉकअपमधील सुरेश ठाकरे व इतर दोन संशयीतांना भेटावयाचे आहे, मला भेटू द्या,असे म्हणाला. तुला त्यांना भेटता येणार नाही, असे सांगीतल्याचा राग आल्याने चिंग्या उर्फ चेतन याने हवालदार लोहार यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली.तसेच बाहेर बघून घेईल अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड केली. आवाज ऐकल्यानंतर गार्डरूममधून अन्य पोलीस र्कमर्र्र्चार्‍यांनी त्याठिकाणी धाव घेतली. या प्रकरणी हवालदार लोहार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

प्रचंड पोलीस बंदोबस्तात केले हजर

खटल्याच्या चौकशीत सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील प्रत्यक्षदशी साक्षीदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे व धमकी दिल्याची बाब सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद व प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी ग्राहय धरून न्यायालयाने चिंग्या याला दोषी धरले. भादवी कलम 353 प्रमाणे तीन वर्ष तसेच भादवी कलम 506 प्रमाणे एक वर्ष सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ बी.चौधरी, अ‍ॅड. सुरेंद्र जी. काबरा यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी पोलीस नाईक तुषार मिस्तरी यांनी मदत केली. चिंग्याला प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिक्षा सुनावल्यानंतर चिंग्या संतप्त झाला. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. आपला काही दोष नसताना शिक्षा सुनावण्यात आली, अस तो बोलत होता. पोलीस बंदोबस्तात त्याची नाशिककडे रवानगी करण्यात आली.