शाहू नगरातील पोलीस वसाहतमधील घटनाः जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव: दारु पिऊन नेहमीच्या होत असेलल्या भांडणातून घरापासून वेगळे राहत असलेल्या पोलीस कर्मचार्याच्या पित्याने माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा घरी येवून पोलीस कर्मचार्याच्या आईच्या पोटात चाकू खुपसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शाहू नगरातील पोलीस लाईनमध्ये घडली. या घटनेत सुरेखा रमेश सुर्यवंशी या जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पोलीस कर्मचार्याच्या संशयित पिता रमेश बाबुराव सुर्यवंशी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दारु पिऊनच आले माफी मागायला
पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार असे की. महेंद्र रमेश सुर्यवंशी हे जिल्हा पोलीस दलात क्युआरटी पथकात नोकरीला आहे. भाऊ मनोज, आई सुरखा, वहिणी भाग्यश्री अशासह ते शाहू नगरातील पोलीस लाईन सेक्टर 3 रुम नं 8 येथे वास्तव्यास आहेत. महेंद्र यांचे वडील रमेश सुर्यवंशी हे सुरक्षा रक्षक असून त्यांना दारुचे व्यसन आहे. दारु पिऊन ते पत्नी सुरेखा हिच्या नेहमी भांडण करतात. आठ दिवसांपूर्वी अशाप्रकारे वाद झाल्याने रमेश सुर्यवंशी हे कुटुंबापासून वेगळे राहत होते. अचानकपणे 27 रोजी सकाळी 8 वाजता रमेश सुर्यवंशी हे घरी आले. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांनी मुलगा मनोज यास माझे चुकले असून मला माफ करा, असे सांगितले. वडीलांना मुलगा मनोज हा घरात घेवून गेला. त्यांनाही घरातील इतरांनीही समजूत घातली. यानंतर रमेश यांनी सर्वांची माफी मागितली. यानंतर महेंद्र व मनोज हे दोन्ही कामावर निघून गेले.
जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार
मुलांना जावून तीन तास उलटत नाही तोच माफी मागण्याच्या बहाणा करुन घरी आलेल्या मद्याच्या नशेतील रमेश सुर्यवंशी यांनी पोलीस कर्मचार्याची आई सुरेखा हिच्याशी वाद घातला. या भांडणातून त्यांनी सुरेखा यांच्या डाव्या बाजूच्या बरगळीखाली, तसेच डाव्या हातावर चाकूने वार करुन दुखापत केली. व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेत सुरेखा ह्या बेशुध्द पडल्या होत्या. त्यांचा मुलगा मनोज यास त्याची पत्नी भाग्यश्री हिने फोनवरुन घडला प्रकार कळविला. यानंतर मनोजने पत्नीसह जखमी तसेच बेधुध्द असलेल्या आई सुरेखा हिस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला अपेक्स हॉस्टिपलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचार्याचा भाऊ मनोज सुर्यवंशी याच्या फिर्यादीवरुन रमेश बाबुराव सुर्यवंशी यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात प्राणघातक हल्लयाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.