पोलिसात तक्रार केल्याने महिलेची दुचाकी पेटवली

0

खडकी : पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका महिलेची दुचाकी पेटवून दिल्याची घटना बुधवारी (दि.5) पहाटे खडकी येथे घडली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पापा उर्फ अल्तमेश कुरेशी (वय 18), ओमकार उर्फ परशा परमार (वय 19) आणि शाहिद कुरेशी (वय 19 सर्व रा. खडकी बाजार ) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, श्रीमती मंगल खैराळे (वय 33 रा. गवळी वाडा, खडकी बाजार ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खैराळे आणि अल्तमेश कुरेशी यांचे पुर्वीचे वाद आहेत. खैराळे यांनी कुरेशीची खडकी पोलिस ठाण्यात तक्रार ही दिली आहे. त्याचा राग मनात ठेऊन कुरेशीने दोन मित्रांच्या मदतीने खैराळे यांची दुचाकी पेटवून दिली. खैराळे यांनी त्यांची दुचाकी महादेव वाडी येथे राहत असलेली मैत्रीण रिना तायडे यांना वापरण्यास दिली होती. याचा सुगावा कुरेशीला लागला त्याने मित्र परमार व शाहिद यांच्या मदतीने बुधवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान महादेव, वाडी येथे जाऊन तायडे यांच्या दारात लावलेली दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवुन दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एच. ठाकुर करीत आहेत.