इमारत मिळेपर्यंत कारभार हाकायचा कोठून हेच ठरले नसल्याने
सत्ताधार्यांनी जनतेला गाजर दाखविल्याची चर्चा
पिंपरी-चिंचवड : शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरु करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने देखील संमती दिली आहे. मात्र आयुक्तालयाची इमारत होईपर्यंत कारभार कुठून हाकायचा हे मात्र अद्याप ठरले नसल्याने 1 मे रोजी सुरु करण्यात येणार्या आयुक्तालयाचा मुहूर्त हुकला आहे. आयुक्त कार्यालयात किमान 200 पोलीस कर्मचार्यांची बसण्याची व्यवस्था आणि कंट्रोल रूम या मूलभूत गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. मागील काही दिवसांपासून भाजपचे शहरातील पदाधिकारी 1 मे रोजीच आयुक्तालय सुरु करणार, असा फुका बार काढून बसले आहेत. मात्र, 1 मे च्या मुहूर्ताला केवळ एक दिवस उरला असताना अद्याप आयुक्तालयासाठी जागा देखील निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधार्यांनी जनतेला आयुक्तालयाचे गाजर दाखविल्याची चर्चा आहे.
ठरलेली जागा विरोधामुळे रद्द
आयुक्तालयासाठी चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारत योग्य असल्याचे, पोलिसांकडून महापालिकेला पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान, शाळेची जागा देण्यास विरोध वाढू लागला आहे. सुरुवातीला नागरी हक्क सुरक्षा समितीने यासाठी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता पालकांनी देखील विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आयुक्तालय सुरु होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकणार असून आता शुभारंभासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त साधला जाणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भव्य इमारतीची गरज
आयुक्तालायाची घोषणा झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने शहरातील विविध जागांचा शोध घेतला. त्यामध्ये संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील तंत्र शिक्षण संस्थेजवळील मोकळी जागा, फ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डी प्राधिकरणातील हेडगेवार भवन आणि चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली. आयुक्तालयासाठी प्रशस्त कार्यालय लागणार आहे. पोलीस आयुक्त, सहआयुक्तपांसून वरिष्ठ अधिकार्यांना स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता आहे. संगणकासह विविध सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत.
212 कोटींचा निधीही मंजूर
आयुक्तालयाच्या विविध कक्षांसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण चार हजार 840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कडून दोन हजार 207 पदे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने भरती करण्यात येणार आहेत. नव्याने भरती करावयाची पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 60 टक्के, त्यानंतर दोन वर्षांनी दुस-या टप्प्यात 20 टक्के आणि त्यानंतर दोन वर्षांनी तिस-या टप्प्यात 20 टक्के पदे भरली जाणार आहेत. कार्यालयीन खर्चासाठी 24 कोटी 4 लाख 233 रुपये आणि निवासस्थानांच्या बांधकामासाठी 188 कोटी 83 लाख 75 हजार रुपये असा एकूण 212 कोटी 87 लाख 75 हजार 233 रुपयांच्या अनांवर्ती निधीला मंजुरी मिळाली आहे .
चिखली पोलीस ठाणेही रेंगाळले
नवीन आयुक्तालयात पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी आणि चिखली तर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हद्दीतील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या 15 ठाण्यांचा समावेश होणार आहे. तसेच चिखली ठाणे देखील होऊ घातले आहे. आयुक्तालयासोबतच चिखली ठाण्याचा देखील मुहूर्त साधला जाणार आहे. मात्र आयुक्तालयच लांबणीवर पडल्याने पोलीस ठाणे कधी सुरु होणार?
अद्याप जागा निश्चित झाली नाही. जागा निश्चित होताच प्रशासकीय सोपस्कार झाल्यानंतर लगेच पोलीस आयुक्तालय सुरु होईल. 1 मे च्या मुहूर्ताबाबत अद्याप काहीही नियोजन करण्यात आले नाही.
-गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन