पुणे । पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या आवारात एका रिक्षा चालकाने वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दयानंद कल्याणअप्पा भालके (रा. धायरी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस नाईक राहुल सुभाष शितोळे यांनी फिर्याद दिली आहे.
कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्येचा प्रयत्न
भालके यांनी आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तांच्या कार्यालयासमोर विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने विषारी औषध पिल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. त्याने त्याच्या मित्रांकडून आणि इतरांकडून कर्ज घेतलेले असून, तो कर्ज फेडू शकत नसल्याच्या तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने जवळपास अडीच लाखाचे कर्ज घेतले होते. पैशासाठी त्याच्यामागे कर्जदारांनी तगादा लावला होता. यासंदर्भात दाद मागण्यासाठी तो आर्थिक गुन्हे शाखेकडे आला होता. मात्र, कार्यालयात जाण्याआधीच त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.