पोलिस आयुक्तालयासाठी तीन लोकेशन निश्‍चित!

0

इमारत पूर्ण होईपर्यंत प्राधिकरणाच्या इमारतीचा होणार वापर?

पिंपरी-चिंचवड : राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला मंजुरी दिली असली तरी, हे आयुक्तालय कुठे असावे, यासाठी इमारतीची शोधमोहीम अद्याप संपलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील तीन इमारती तूर्त पोलिस आयुक्तालयासाठी निश्‍चित करण्यात आल्या असून, गृहमंत्रालय त्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. त्यात पहिला पर्याय हा चिंचवड गावातील महापालिकेची शाळा इमारत, दुसरा पर्याय हा आकुर्डी स्टेशननजीकची नवीन प्राधिकरण इमारत, तर तिसरा पर्याय हा टिळक चौकातील प्राधिकरणाची जुनी इमारत ठरविण्यात आलेला आहे. या पैकी एका इमारतीत हे कार्यालय जाऊ शकते. नवीन पोलिस आयुक्तालयासाठी 10 एकरचा भूखंड हा इमारतीसाठी तर 40 एकरचा भूखंड हा मुख्यालयासाठी लागणार आहे. शहरात तूर्त तरी एवढी मोठी जागा दिसत नाही. त्यामुळे हे पोलिस आयुक्तालय तळेगाव, देहूरोड, आळंदी किंवा चाकणमध्येदेखील होण्याची शक्यता गृहखात्याच्या वरिष्ठांनी वर्तविली आहे.

1 मेरोजी नवीन सीपी कार्यालयाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी दिली आहे. शहरातील वाढलेली गुंडगिरी, कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला गंभीर प्रश्‍न आणि खास करून औद्योगिक क्षेत्रातून झालेल्या मागणीचा विचार करून या स्वतंत्र आयुक्तालयास मंजुरी मिळाली आहे. गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी व पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला हे या नव्या आयुक्तालयासाठी इमारतीचा शोध घेत आहेत. 1 मेरोजी तात्पुरत्या स्वरुपात या नव्या पोलिस आयुक्तालयाचे उद्घाटन करावयाचे असल्याने ही शोधमोहीम सद्या जोरात सुरु आहे. त्यासाठी तीन इमारती अधिकार्‍यांनी पसंत केल्या आहेत. या संदर्भात बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले, की पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी योग्य सरकारी जागेचा शोध सुरु आहे. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हे आयुक्तालय एखाद्या सरकारी इमारतीत सुरु करण्यात येईल. शक्यतोवर पिंपरी-चिंचवडमध्येच ही इमारत असावी, असा प्रयत्न आहे. लवकरच हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले. निगडी येथील प्राधिकरणाच्या इमारतीतील एक इमारत, अथवा प्राधिकरणाचीच पिंपरी-चिंचवडमधील एफ इमारत, किंवा डी. वाय. पाटील महाविद्यालयानजीकच्या महापालिकेच्या शाळेची इमारत या तीनपैकी एका इमारतीत तात्पुरते आयुक्तालय राहण्याची शक्यता, पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी वर्तविली आहे.

शासकीय जमिनीचा शोधही सुरु…
नवीन पोलिस आयुक्तालयाच्याअंतर्गत निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी आणि चिखली या पोलिस ठाण्यांचा समावेश राहणार असून, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणारे चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी हे पोलिस ठाणेही शहर आयुक्तालयात समाविष्ट केली जाणार आहेत. या आयुक्तालयाचा मोठा व्याप पाहाता, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळदेखील लागणार असून, हे मनुष्यबळ तूर्त पुणे पोलिस आयुक्तालय व ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांकडून वर्ग करून घेतले जाणार आहे. नवीन आयुक्तालयासाठी 10 एकरचा मोठा भूखंड जेथे इमारत बांधता येईल आणि 40 एकरचा भूखंड मुख्यालय निर्मितीसाठी लागणार आहे. अशा शासकीय जमिनीचा शोध सद्या सुरु आहे. शासकीय जमीन न मिळाल्यास खासगी जमीन विकत घ्यावी लागणार आहे. आयुक्तालयासाठी पिंपरी-चिंचवड शहरालाच प्राधान्य असले तरी, गरज पडल्यास हे आयुक्तालय शहराबाहेरदेखील जाऊ शकते, अशी माहितीही अधिकारी सूत्राने दिली आहे.