पोलिस उपअधिक्षकांच्या भेटीकडे कर्मचार्‍यांची पाठ

0

वरणगाव। जिल्हा पोलिस उपअधिक्षकांची वरणगाव पोलिस स्टेशनला पूर्वनियोजीत भेट असतांना देखील दोन अधिकार्‍यांव्यतिरिक्त सर्वच कर्मचार्‍यांनी पाठ फिरवल्याने अधिकारी बिना चौकशीने मुक्ताईनगरकडे रवाना झाले. वरणगाव शहर हे मुंबई-नागपूर महामार्गावर असून शहराला 30 खेडे लागून आहे. येथील पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दोन लाखांच्यावर लोकसंख्या आहे. त्या दृष्टीकोनातून दैनंदीन भांडणतंटे वादविवाद व अपघाताच्या दुर्दैवी घटना वारंवार घडत असतात. मात्र वरणगाव पोलिस स्टेशनला अनेक वर्षांपासून कर्मचारी संख्याबळ कमकुवत असल्याने आणि अधिकार्‍यांची नेहमीचीच दांडी मारण्याची भर असते. शहरात व परिसरात छोटेमोठ्या दुर्दैवी घडल्यानंतर पोलिस वेळेवर पोहचत नसल्याने जनतेमध्ये आक्रोष निर्माण होवून घटनेला वेगळे स्वरूप प्राप्त होते.

प्रभारी अधिकार्‍याने केली कानउघाडणी
अनेक वर्षांपासून पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. हा सर्व आलेख तपासण्याकामी जिल्हा पोलिस उपअधिक्षक अमित बच्चनसिंग व भुसावळ तालुक्याचे पोलिस उपअधिक्षक निलोत्पल यांनी शनिवार 13 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान वरणगाव पोलिसांना पूर्वनियोजीत सुचना देवून भेटीकरीता आले असता पोलिस स्टेशनला मुक्ताईनगरचे पोलिस सहाय्यक निरिक्षक प्रभारी अधिकारी हेमंत कडुकार व पोलिस उपनिरिक्षक रफीक पठाण यांच्या व्यतीरीक्त पोलिस ठाण्यात कुणीही हजर नसल्याने पोलिस उपअधिक्षक बच्चनसिंग आपल्या वाहनातून न उतरता मुक्ताईनगरकडे रवाना झाले. यामुळे शहरात तर्कवितर्क लावले जात असून तरी पोलिस उपअधिक्षक बच्चनसिंग वरणगाव पोलिसांवर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वरणगाव पोलिस स्टेशनला जळगाव जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांची भेट असतांना पोलिस कर्मचारी हजर नसल्याने मुक्ताईनगरचे प्रभारी अधिकारी हेमंत कुडकार यांनी पोलिस हजेरी मास्तर भास्कर ठाकूर यांची चांगलीच कानउघाडणी केली.