भुसावळात हजेरी ; सावदा येथील उपनिरीक्षकांचे पाच हजारांचे लाच प्रकरण
भुसावळ- सावदा पोलिस ठाण्यातील तत्कालीन उपनिरीक्षक गणेश इंगळे यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात लोहमार्गचे अपर पोलिस महासंचालक व तत्कालीन नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी शनिवारी भुसावळ न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे आपली साक्ष नोंदवली.
खटला दाखल करण्याच्या अधिकारामुळे नोंदवली साक्ष
2015 मध्ये सावदा भागातील तक्रारदाराविरुद्ध वॉरंट निघाल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी सावदा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती व तक्रारदाराने तक्रार नोंदवल्याने लाच स्वीकारताना इंगळे यांना अटक करण्यात आली होती. संशयीत आरोपी हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगीचे अधिकार नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षकांना असल्याने त्यावेळी या पदावर जयजीत सिंग असल्याने त्यांची शनिवारी साक्ष नोंदवण्यात आली. सिंग यांनी न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे आपल्याला अधिकारी निलंबनासह खटला दाखल करण्याची परवानगी देण्याचे अधिकार असल्याचे न्यायालयाला सांगितले. याप्रसंगी पैरवी अधिकारी म्हणून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी त्यांना सहकार्य केले.