पोलिस उपनिरीक्षक सासर्‍यास पोलिस कोठडी

0

जळगाव। सुनेचा छळ प्रकरणी शहर पोलिसात दाखल असलेल्या गुन्हात पोलिसांनी मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी मिसबा अझरुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून पती अझरुद्दीन शेख, सासु रुकसानाबी शेख, सासरे हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख,जेठ वसीम शेख, दिर मोहसीन शेख, नणंद मुबशरा शेख यांच्या विरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पती अझरुद्दीन शेख, जेठ वसीम शेख, दिर मोहसीन शेख व नणंद मुबशरा शेख यांनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी मिसबा शेख हया रस्त्याने घरी जात होत्या.

यावेळी सासु-सासरे यांनी आपल्या कारने येवून फिर्यादीची आत्या नसरीनबानो लतीफ शेख यांना पीएसआय हुसोनोद्दीन शेख यांनी त्यांचे डोके पकडून गाडीवर आपटून त्यांना जोरात ढकलले. त्यामुळे नसरीनबानो यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मेंदुत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे याप्रकरणी फिर्यादीचा पुरवणी जबाब घेवून संशयित आरोपींविरुध्द 307 व 406 हे वाढीव कलम लावण्यात आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी पीएसआय हुसनोद्दीन अब्दुल कादर शेख यांना अटक करून न्यायालया हजर केले. न्या. कांबळे यांनी संशयिताला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.