पोलिस करणार सिनेमागृहांच्या पार्किंगची तपासणी!

0

पुणे/पिंपरी-चिंचवड : विकास नियंत्रण आराखड्याप्रमाणे (डीसी रुल्स) सिनेमागृहे व मॉल्स यांनी पार्किंगसाठी जागा सोडली आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने दोन दिवशीय मोहिम हाती घेण्यात आली आहे. बहुतांश सिनेमागृह व मल्टिप्लेक्स चालकांनी पार्किंगसाठी पुरेशी व नियमाप्रमाणे जागा न ठेवल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, सिनेमागृहांबाहेर वाहने पार्क केली जात असल्याने पादचारी व वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही शहरांत ही खास मोहिम राबवली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांच्यावतीने देण्यात आली.

… तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई!
पोलिस उपायुक्त (वाहतूक) अशोक मोराळे यांनी सांगितले, की लवकरच याबाबत खास मोहिम हाती घेतली जाणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सिनेमागृह व मल्टिप्लेक्स चालविणार्‍या 60 जणांची गतशनिवारी या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे. पार्किंगच्या समस्या आणि वाहतूक कोंडीचा त्रास यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली; तसेच सूचनाही देण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास ही मोहिम आणखीही काही दिवस वाढवता येईल. तसेच, मॉल्सच्या पार्किंग व्यवस्थेचीही तपासणी केली जाईल. डीसी रूल्सप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करणे सिनेमागृहे व मॉल्स यांच्यासाठी बंधनकारक आहे, असेही मोराळे यांनी सांगितले. सिनेमागृह व मॉल्सच्या समोर अस्ताव्यस्त लावलेली वाहने पाहाता, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तसेच, मॉल्स व सिनेमागृहांनी पार्किंगच्या जागेचा वापर इतर कारणांसाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी चालविला असल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेअंतर्गत असा काही प्रकार दिसून आला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही मोराळे यांनी दिला.

पार्किंग व्यवस्था फक्त कागदोपत्रीच का?
पार्किंगसाठी पुरेशी तरतूद केल्याशिवाय वाहतूक शाखेकडून सिनेमागृहे किंवा मॉल्स यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेच जात नाही. पुणे किंवा पिंपरी-चिंचवड येथे असलेल्या प्रत्येक सिनेमागृह व मॉल्सनी या अटीवरच तसे प्रमाणपत्र मिळवलेले आहे. प्रत्येक मॉल्स व सिनेमागृहांकडे चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी किती जागा आहे, याची माहिती व संबंधित कागदपत्रे वाहतूक शाखेकडे आहेत. त्यानुसार खरोखर पार्किंगव्यवस्था आहे किंवा नाही, याची पडताळणी आता वाहतूक शाखा करणार आहे. जर पार्किंगची व्यवस्था असेल तर मग् वाहने रस्त्यावर किंवा समोर का उभी केली जातात? असादेखील प्रश्‍न आहे. याबाबत वाहतूक शाखेने संबंधित सिनेमागृहांचे व्यवस्थापक व मालक यांनादेखील सूचना दिलेली आहे.