पोलिस ठाण्याच्या बाहेर विषप्राशन केलेल्या भुसाावळातील विवाहितेचा मृत्यू

Argument between couple in Bhusawal : Pregnant wife dies after taking poison after coming out of police station  भुसावळ : शहरातील हनुमान नगरातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीतील वाद विकोपाला गेल्याने त्यांचा वाद बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर दोघांची समजूत घालून माघारी पाठवण्यात आले मात्र महिलेने त्यानंतर विषारी द्रव प्राशन केल्याने तिचा जळगावात मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 1.30 वाजता घडली. माया ललित फिरके (30, रा.हनुमान नगर, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव असून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे.

पोलिस ठाण्यातून माघारी फिरताच केले विष प्राशन
भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी माया फिरके व ललित फिरके हे दाम्पत्य कौटुंबिक वाद झाल्यानंतर आले होते. येथे पोलिसांनी दोन्ही जणांची समजूत काढून माघारी पाठवले मात्र विवाहिता माया ललित फिरके यांनी रोगर नावाचे किटकनाशक औषध सेवन केले त्याबाबतची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ महिला पोलिसासोबत अत्यवस्थ अवस्थेत माया फिरके यांना ट्रामा केअर सेंटरला उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर जळगावात हलवण्यात आल्यानंतर उपचार सुरू असतांना विवाहितेचा मृत्यू झाला.

घटनेची चौकशी होणार : पोलिस उपअधीक्षक
विवाहितेने विष प्राशन केल्याने या गंभीर घटनेची चौकशी केली जाणार आहे. नेमका काय विषय झाला. पोलिस ठाण्यात ती महिला काय तक्रार घेऊन आली होती, तिने काय तक्रार केली होती, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.