पोलिस ठाण्यातच जावायाने फोडले सासर्‍याचे डोके

0

जळगाव । शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या सासरे व जावई यांच्यात शाब्दीक वाद झाला. या वादातून पोलिस स्टेशनमध्ये चक्क पोलिसांसमक्ष जावायाने सासर्‍याचे डोके फोडल्याची घटना सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी जावायाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडनगरी येथील दुध व्यवसायिक शिवाजी जयराम पाटील वय 39 यांच्या मुलीचा प्रशांत दत्तू पाटील वय 27 यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यान शिवाजी पाटील यांच्यात नेहमी वाद होतात.

पोलिसांसमक्ष झाला वाद
आज सकाळी शिवाजी पाटील हे नेहमीप्रमाणे शहरात दुध वाटपासाठी आले असता, गणपती हॉस्पिटल परिसरात त्यांच्या जावाई प्रशांत यांने गाडीला लावलेली दुधाची कॅन काढून घेत पैश्याची मागणी केली. दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. यावेळी प्रशांत याने दुधाची कॅन काढून घेत या ठिकाणावरून पळ काढला. दरम्यान शिवाजी पाटील हे तक्रार देण्यासाठी रामानंद नगर पोलिसात आले. जावई प्रशांत या देखील रामानंद नगर पोलिसात आला.रामानंद नगर पोलिसात शिवाजी पाटील व जावई प्रशांत पाटील हा दोघे आले असता, दोघांमध्ये पोलिसांसमक्ष वाद झाला. यावेळी जावई याने सासर्याला मारहाण करीत हातातील मोबाईल शिवाजी पाटील यांच्यात डोक्यात मारला. यात शिवाजी पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून ते रक्तबंबाळ झाले.

दोघांवर कारवाई
शिवाजी पाटील व जावई प्रशांत पाटील यांनी पोलिसांसमक्ष पोलिस स्टेशनमध्ये वाद केल्याने पोलिस कर्मचारी विश्‍वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सासरे शिवाजी पाटील व जावई प्रशांत पाटील यांच्याविरुध्द भाग-6 गुरन 4/2018 भादवी कलम 160 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोहेकॉ. संभाजी पाटील करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. तसेच जखमीवर उपचार करण्यात आले आहे.