पोलिस दलात लवकरच मोबाईल लोकेटर येणार

0

पुणे ।दहशतवादी कारवायांचा कट रचणार्‍या, अफवा पसरवणार्‍या आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या वाईट प्रवृत्तीचा तात्काळ शोध घेता यावा, तसेच कायदा व सुव्यस्था सक्षम ठेवता यावी, यासाठी लवकरच मोबाईल लोकेटरची सुविधा उभारली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस वायरलेस विभागाचे पोलीस महानिरीक्षक अब्दूर रहेमान यांनी दिली. रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन रहेमान यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

बोसांमुळे तांत्रिक संवादाची दारे खुली
सर जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओचा शोध लावला. मात्र, या शोधनाचा मानवजातीला अधिक फायदा झाला पाहिजे, या हेतूने त्यांनी त्याचे अधिकार नोंदवले नाहीत. परिणामी पुढे मार्कोनीने त्यात काही सुधारणा करीत रेडिओचा शोध आपल्या नावावर नोंदवला. परंतु, बोस यांनी मार्कोनीच्या कित्येक वर्षे आधीच तांत्रिक संवादाची दारे खुली केली होती. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासह इतर अनेक विषयात बोस यांचा सखोल अभ्यास होता. ते व्यासंगी साहित्यिकही होते, असे सुधीर फाकटकर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. विलास रबडे आणि सहकार्‍यांनी हॅम रेडिओची प्रात्यक्षिके दाखविली.

रेडिओचा जनक विषयावर व्याख्यान
यानिमित्त खोडद येथील जीएमआरटीचे तंत्रज्ञ सुधीर फाकटकर यांचे रेडिओचा जनक : सर जगदीशचंद्र बोस यावर सचित्र व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरुप, भारतीय विद्याभवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, हॅम ऑपरेटर विलास रबडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

अब्दूर रेहमान म्हणाले, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. त्याच जोरावर अनेक वैज्ञानिकांनी मोलाचे योगदान दिले. आजच्या युवापिढीने शालेय वयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला, तर भारत जलद गतीने महासत्ता बनू शकेल. महाराष्ट्र पोलीस दलाचा वायरलेस विभाग अतिशय सक्षम आहे. इतर राज्यातील अनेक पोलीस येथे  प्रशिक्षणासाठी येतात. वायरलेस यंत्रणेला अधिक आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. संदीप नाटेकर यांनी प्रास्ताविक केले. विश्‍वास काळे यांनी त्या काळातील इतर वैज्ञानिकांचे योगदान सांगितले. डॉ. गोविंद स्वरूप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा कुलकर्णी यांनी आभार मानले.