पुणे । मुंबईतील लोअर परेल येथील वन अबव्ह आणि मोजो बार आगीतील दुर्घटनेत 14 लोकांचा बळी गेला. हुक्का पार्लरमुळेच ही आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यातही अशा पद्धतीने बेकायदेशीर रेस्टोरंट अँड बार आणि हुक्का पार्लर चालविली जात आहेत. कोंढवा परिसरात असलेल्या अवैध ’बिटोस’ या रेस्टोरंट आणि बारमध्येही अशा प्रकारचे हुक्का पार्लर चालविले जात आहे. वारंवार तक्रार करूनही स्थानिक पोलिस याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन मुंबईतल्या कमला मिल आगीप्रमाणे पुण्यातही तशी घटना होण्याची वाट पाहतेय का? असा सवाल परिसरातील संतप्त रहिवाशांनी विचारला आहे.मुंबईतील कमला मिल आगीची दुर्घटना आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने बिटोस हॉटेलवर पडलेल्या छाप्याच्या निमित्ताने रहिवाशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या अवैध ’बिटोस’ या रेस्टोरंट आणि बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर 31 डिसेंबरला पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामध्ये जवळपास 27 हुक्का स्पॉट जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस आणि अधिकारी मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत. बिटोस हॉटेलकडे दारू विक्रीचाही परवाना नसल्याचे आढळून आले होते.
रहिवासी आक्रमक
एनआयबीएम येथील रुणवाल डायमंड या सोसायटीच्या इमारतीत हे हॉटेल आहे. दिनेश मोहनलाल गुप्ता, अमित जयकिशन गोयल आणि राहुल राजेंद्र प्रसाद जैन हे तिघे या हॉटेलचे मालक आहेत. या कारवाईनंतर येथील रहिवाशांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून, येथे अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असल्याने हॉटेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तीनवेळा या हॉटेलला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. ना-हरकत प्रमाणपत्र नसताना येथे हे हॉटेल चालू आहे. या ठिकाणी पूर्वी ग्रंथालय होते. त्याजागी हवी तशी मोडतोड करून बांधकाम केले आहे. टेरेसच्या बेकायदेशीर वापर केला आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
हॉटेल बंद करण्याची मागणी
बिटोस हॉटेलमध्ये चालणार्या बेकायदेशीर गोष्टींचा आम्हा नागरिकांना त्रास होतो. येथे येणारा ग्राहकांच्या गाड्या, पार्किंगचा प्रश्न, तरुणाईची हुल्लडबाजी, गोंधळ यामुळे येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांना भीती वाटते. त्यामुळे या हॉटेलला कोणत्याही प्रकारचा परवाना देऊ नये, तसेच बेकायदेशीर गोष्टी करत असलेल्या या हॉटेलवर कारवाई करून ते बंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व रहिवाशांनी केली आहे. पत्रकार परिषदेला सुशीला मिश्रा, अमित शहा, इजाज हुसेन, त्यांच्या वकील कीर्ती अहुजा उपस्थित होते.