जळगाव। दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या इमारतीवरून उडी मारत स्वत:ला पेटवून घेत शुभम ज्ञानेश्वर महाजन याने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून त्याचा मोबाइल इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातच आज गुरूवारी देखील पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्रात जावून घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर घटना पाहणार्या पाच ते सहा विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले.
मोबाईलमध्ये सिमच नाही…
शुभमने छतावरून उडी घेवून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना त्याची सॅक शौचालयात मिळून आली होती. याच सॅकमध्ये त्याचा मोबाइलही होता. यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी शुभमची बॅग, चप्पल, पेट्रोलची बाटली मंगळवारीच जप्त केली होती. दरम्यान, बुधवारी त्याच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली. मोबाइल सुरू केल्यानंतर त्यात एकही मोबाइल क्रमांक नव्हता, कॉल लिस्टही दिसत नव्हती. पोलिसांनी अधिक खोलात तपास केला असता, मोबाइलमध्ये सिमकार्डच नसल्याचे समोर आले. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर शुभम अभ्यासिकेत गेला. यावेळी त्याच्या हातात एक पाण्याची बाटली होती. अभ्यासिकेत काही वेळ थांबल्यानंतर थेट छतावर गेला. छतावरून उडी घेतल्यानंतर पेटत्या अवस्थेत खाली कोसळतानाही तो एका कॅमेर्यात दिसून आला आहे. पोलिसांनी कॅमेर्याचे फुटेज ताब्यात घेत बुधवारी ते तपासले. यानंतर गुरूवारी देखील पोलिसांनी पुन्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले.
घटनेविषयी महाजनांशी केली चर्चा
शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकुर, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांनी गुरूवारी पुन्हा दीपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्र गाठत घटनास्थळाची पाहणी केली. ज्या ठिकाणाहून त्याने उडी मारली व तो ज्या ठिकाणी पडला त्या जागेची त्यांनी पाहणी केली. दरम्यान, शुभम याने स्वत:ला पेटविल्यानंतर तो त्या गच्चीवरून खाली पडला असल्याचाही संशय पोलिसांनाकडून वर्तविण्यात येत आहे.
चौकशीसाठी विद्यार्थ्यांना बोलविले
पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी गुरूवारी सकाळी दीपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर शुभम याने पेटवून घेत खाली उडी मारल्यानंतर परिसरात उपस्थित असणार्या पाच ते सहा विद्यार्थ्यांना चौकशीसाठी दुपारी पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. यावेळी त्यांची चौकशी करत पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान, शुभम याने आत्महत्या का केली असावी? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी तपासाला वेग दिला असून मित्र मंडळी, नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिल्यानंत यजुर्वेंद्र महजान यांच्याशी घटनेविषयी चर्चा केली.