चोपडा- पार्टी विथ डिफरंट म्हटल्या जाणार्या भाजपा पदाधिकार्यांनी वाहन अडवल्याच्या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घालत थेट पोलिस निरीक्षकांच्या वर्दीवरच हात घातल्याने पोलिसांनी त्यांना चांगल्याच खाक्या दाखवत कायद्यापेक्षा मोठे कुणी नसल्याचा प्रत्यय दिला गुरुवारी. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यांना अटक करण्यात आली होती. संशयीतांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली मात्र दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाहन अडवल्याचा रागातून घटना
चोपडा शहरातील शिवाजी चौकात गुरुवारी सकाळी 11 वाजता भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांची कार (क्र. एम.एच.19 सी.एफ.3493) तपासणीसाठी व सीटबेल्ट न लावण्याच्या कारणावरून वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी अडवल्यानंतरही त्यांनी वाहन न थांबवल्याने पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून ते बाजार समितीजवळील मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची कार अडवल्यानंतर वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विजय निकम व भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यात पंचायत समितीसमोर बाचाबाची सुरू झाली. त्याचवेळी नरेंद्र पाटील यांनी भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल उर्फ राजू चिरंजीलाल शर्मा यांना फोन लावून बोलावले तर निकम यांनीही निरीक्षक किसन नजनपाटील यांना भ्रमणध्वनी करून घटना सांगताच तेही घटनास्थळी आले. यावेळी नरेंद्र पाटील, अनिल शर्मा व नजनपाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यात अनिल शर्मा यांनी नजनपाटील यांची कॉलर पकडताच पोलिसांनी या दोघा आजी-माजी शहराध्यक्षांना चोप दिला होता तर पोलिस ठाण्याच्या आवारातच मनीष पारीख यांनी निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना वर्दी उतरवण्याची धमकी दिल्याने त्यांच्यावरही कारवाई झाली होती. कॉन्स्टेबल विजय अमृत निकम यांच्या फिर्यादीवरून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल शर्मा आणि भाजपचे कार्यकर्ते मनीष पारीख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती तर शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.