पोलिस प्रशासनाची दडपशाही ; आंदोलन टाळण्यासाठी पोलिस ठाण्यात बसवले

0

भारीपाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचा आरोप

भुसावळ- फैजपूर येथील कृषी शिबिरासाठी जात असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळातील भारीपा कार्यकर्त्यांनी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा राजीनामा मागण्यात आल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी शहरातील गांधी पुतळ्याजवळ घडली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रमोद पाटील यांच्या फिर्यादीनुसार जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बाळा पवार यांच्यासह 13 पदाधिकार्‍यांविरुद्ध जमावबंदीचे उल्लंघण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवार, 8 रोजी जळगाव दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात कुठलेही आंदोलन न करण्यासाठी सोनवणे यांच्यासह पवार यांना बाजारपेठ पोलिसांनी दिवसभर नजरकैदेत ठेवले तर पोलिसांची ही दडपशाही चुकीची असल्याचा आरोप विनोद सोनवणे यांनी केला आहे.

भेटण्यासाठी बोलावले मात्र दिवसभर पोलिस ठाण्यात थांबवले
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती, असे सांगत सोनवणे म्हणाले की, जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करावी, जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री मिळावा, शेती मालाला योग्य हमी भाव द्यावा, अशा मागण्या होत्या मात्र पोलिस प्रशासनाने केवळ दोन मिनिटे भेटायला, या असे सांगत बोलावले मात्र दिवसभर पोलिस ठाण्यात नजरकैदेत बसवून ठेवले, असा असे सोनवणे म्हणाले. पोलिस प्रशासनाची ही दडपशाही घटनाबाह्य असून लोकशाहीत सरकार व प्रशासनाची हुकूमशाही असल्याचेही ते म्हणाले.