पोलिस व गणेशभक्तांच्या सेवेसाठी मिनी हॉस्पिटल

0

पुणे । गणेशोत्सवाच्या काळात पोलिस, कर्मचारी व भाविकांच्या अचानक निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने मिनी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. हे हॉस्पिटल विश्रामबाग फरासखाना पोलिस स्टेशनच्या आवारात उभारण्यात आले असून या हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ब्रह्मानंद लाहोटी, अजय झंवर, डॉ. अनंत बागुल आदी उपस्थित होते. मिनी हॉस्पिटलचे उद्घाटन 24 ऑगस्टला दुपारी 2 वाजता पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. अनंत बागुल म्हणाले, मिनी हॉस्पिटलमध्ये साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सर्व प्रकाराची औषध, इंजेक्शन, सलाइन, 5 बेड यांसह अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांकरिता स्वतंत्र्य विभाग आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह डॉक्टर व नर्सची 20 जणांची टीम सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात दहा दिवस सुरू राहणार आहे. तसेच हॉस्पिटलजवळ रुग्णवाहिकादेखील सज्ज असणार आहे.