पोलीसच चोरावर मोर

0

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. या वाक्याचा अर्थ साधासोपा आहे. सत्याचे रक्षण करायचे आणि असत्याला शासन करायचे…, असा साधासरळ अर्थ या ब्रीदवाक्याचा आहे. या वाक्याप्रमाणे आपले महाराष्ट्र पोलीस दल वागते आणि चालतेदेखील… मुंबई पोलिसांची ख्याती तर सातासमुद्रापार आहे. जागतिक पातळीवर मुंबई पोलिसांची दखल घेतली जाते. स्कॉटलँड पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा क्रमांक लागतो. मुंबई पोलीस अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलाचे अविभाज्य अंग आहे. इतकंच नाही तर मुंबईवर झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याचा यशस्वी सामना करणार्‍या महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी दस्तुरखुद राष्ट्रपतींनीही वाखाणली होती. देशातील अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडून काढण्यातही महाराष्ट्र पोलीस अग्रभागी आहे. शौर्याच्या अनेक गाथा या पोलीस दलातील बहादूर पोलिसांच्या नावे आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि उत्तुंग अशा कामगिरीबद्दल सर्वत्र गौरवले गेलेले आहेत. खरेतर मुंबई पोलीस काय किंवा महाराष्ट्र पोलीस दल काय, यांच्या गौरवगाथा गाऊ तितक्या थोड्याच आहेत. इतके या दलाचे काम मोठे आहे. मात्र, काल या गौरवाला बट्टा लागला. महाराष्ट्र पोलीस दलावर एक काळा डाग लागला. करोडो रुपयांवर डल्ला मारल्याप्रकरणी कोल्हापुरातील पोलीस अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले!

कोल्हापुरातल्या अट्टल चोरट्याला हाताशी धरून सांगली पोलिसांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांच्या पथकाने 3 कोटी 18 लाख, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या पथकाने 6 कोटींच्या रोखरकमेवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह 8 पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर घरफोडी, कट रचणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे यांच्यासह अनेक गंभीर स्वरूपाचे दोन स्वतंत्र गुन्हे कोडोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण अतिशय नाट्यमयरीत्या आणि सुनियोजित कट रचून घडवण्यात आल्याचे आता तपासात उघड होत आहे. गेल्या वर्षी मैमुद्दीन मुल्ला या सराईत चोराने वारणा कोडोली इथल्या शिक्षण समूहाच्या शिक्षक कॉलनीतून 3 कोटी रुपयांची रक्कम लांबवली होती. त्याने ही रक्कम मिरजेत लपवून ठेवली होती. ही माहिती सांगली पोलिसांना कळताच तपासाच्या नावाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासोबत रवींद्र पाटील, दीपक पाटील, शंकर पाटील, प्रवीण सावंत या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी वारणेत येऊन 6 कोटींची रक्कम चोरून नेली. यानंतर या प्रकरणाची माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी विश्‍वनाथ धनवट यांनी पुन्हा अन्य पोलिसांचे दुसरे पथक तयार करत दीपक पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरपळकर यांना घेऊन पुन्हा वारणानगर येथे येऊन 3 कोटी 18 लाखांवर डल्ला मारला. या प्रकरणाची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझार सरनोबत यांनी वारणा कडोली पोलीस ठाण्यात केल्यानंतर संबंधित सर्व पोलिसांवर गुन्हा नोंद करण्यात आला. एकूणच या प्रकरणामध्ये चोरालाच सोबत घेऊन पोलिसांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहेत. खरेतर या प्रकरणामुळे पोलीसच चोरावर मोर ठरले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्हापूर पोलीस दलाने सांगलीतील दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. इतकंच नाही तर कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या सांगलीच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे.

हे संपूर्ण प्रकरण अतिशय रंजक आहे. मात्र, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा एकूणच पोलीस खात्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लाचखोर पोलिसांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, चोरालाच हाताशी धरून तपासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याची घटना ही खरोखरंच अजब घटना म्हणावी लागेल. तुटपुंज्या पगारामुळे आणि अल्प सोयीसुविधांमुळे पोलीस लाच घेतात, असा एक पोलिसांच्या बाजूचा सूर कायमच आळवला जातो. कमी पगारामुळे पोलीस लाच घेतात, या विधानाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. याचे कारण असे की, सेवेत दाखल होतानाच या सर्व पोलिसांना तनख्याची सविस्तर माहिती असते. मग वर्दी अंगावर चढवल्यानंतर घेतलेल्या निर्णयात बदल होण्याचे कारण तरी काय?

सांगली पोलिसांनी अखंड महाराष्ट्र पोलीस दलाला मान खाली घालायला लावली, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण सत्याचे रक्षण करणे आणि असत्याला शासन करणे असे आपल्या पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढाई ज्यांच्या जोरावर लढायची आहे, तेच जर अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक होत असतील तर मग पुढे काही बोलायलाच नको…!