पोलीसदादा तुम्ही सुध्दा

0

जळगाव । भुसावळ शहरातुन सहा महिन्यांपुर्वी एका व्यक्तीचा 90 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हा मोबाईल चोराकडून घेवून पोलीस कर्मचार्‍याने वापरून 20 हजार रुपये किमतीला विकला असल्याची बाब समोर येताच पोलीस कर्मचार्‍याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.पोलीस कर्मचार्‍यानेच असे कृत्य केल्याने पोलीस दादा तुम्ही सुध्दा असे म्हणण्याची वेळ आली. भुसावळ येथून सहा महिन्यांपुर्वी 90 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला होता.याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.मोबाईल फैजपूर येथील भुषण भिरूड याच्याकडे चोरीचा महागडा मोबाईल असल्याची माहिती फैजपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी राजेश बर्हाटे यास मिळाली.त्याने भुषणला गाठून मोबाईल हिसकावला व कुणाला काही सांगीतले तर तु चोरीच्या गुन्हयात तुला अटकवेल असा दम दिला. हा मोबाईल पोलीस ठाण्यात जमा करतो असे सांगीतले. मात्र मोबाईल जमा न करता बर्हाटे यांनी काही दिवस वापरून फैजपूर येथील व्यापारी कल्पेश सिंधी याला 20 हजार रुपयांना विकला.

असा लागला तपास
सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी मोबाईल चोरीचा तपास पो.नि. निमाळे यांच्याकडे दिला होता.त्यांच्या पथकाने फैजपूरला येवून पूर्ण चौकशी केली आणि भुषण भिरूड, कल्पेश सिंधी व पोलीस राजेश बर्हाटे यांना निलोत्पल यांच्या समोर हजर केले. त्यात मोबाईबाबत सर्व घटना समोर आली. भुषण भिरूड व कल्पेश सिंधी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पो.कॉ.बर्हाटे यांची फैजपूर येथून जळगाव पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली. पो.कॉ.बर्हाटे हा फैजपूर येथील अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरलेला आहे.