पोलीसांच्या कारवाईमुळे पाच कंदील चौकासह आग्रारोडने घेतला मोकळा श्‍वास

0

धुळे । शहरातील पाचकंदील चौकासह आग्रारोडवरील हातगाडी व्यावसायीकांवर कारवाई करीत आज वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी या सर्व लोटगाड्या शहर पोलिस ठाण्याच्या आवारात खेचून आणल्या. वाहतुक शाखेच्या या कारवाईने आग्रारोड काही काळ का होईना मोकळा श्‍वास घेणार असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी ठरते आहे. शिवाय आग्रारोडच नव्हे तर शहरातील अन्य रस्त्यांवरही अशीच वाहतुकीची कोंडी होत असून ते रस्ते देखील वाहतुकीसाठी मोकळे करावेत, अशी मागणी या निमित्ताने होवू लागली आहे. शहरातील आग्रारोड हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावरील वर्दळही खूप आहे. यातच दुकानाच्या पुढील भागात काही छोट्या विक्रेत्यांनी बस्थान मांडले आहे. हातगाडी व्यावसायीक उभे रहात असल्याने मुळ रस्ता साठ फुटाचा असला तरी प्रत्यक्षात आग्रारोड वाहतुकीसाठी 15 ते 20 फूटच मोकळा असतो. त्यामुळे आग्रारोडवर वाहतुकीची कोंडी होत होती.

दंडमुळे दुहेरी नुकसान
शहर वाहतुक शाखा अधुन- मधून आग्रारोडवरील या हातगाडी व्यावसायीकांना हुसकावून लावीत असते. अगदीच नाही ऐकले तर त्यांना खेचून शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नेले जाते. तेथे गाडीवरील माल घेवून जाण्याची मुभा मालकाला मिळते. मात्र गाडीबाबत न्यायालयात जावून दंड भरल्यानंतरच गाडी सोडली जाते. त्यामुळे दिवसभरचा व्यवसाय तर बुडतोच शिवाय न्यायालयीन दंडाची रक्कम भरावी लागत असल्याने या छोट्या व्यावसायीकांचे दुहेरी नुकसान होते.

मनपाने ठोस उपयायोजना करावी
वाहतुक कर्मचारी याकडे थोडा कानाडोळा करतात. कारवाईमुळे येणारी नाराजी आम्ही स्विकारायची आणि दंडातुन मिळणारी रक्कम महापालिकेने घ्यायची. यामुळे वाहतुक शाखाही अशा कारवाईला फारशी उत्सुक नसते. मुळात शहरातील ही वाहतुक समस्या कायमस्वरूपी निकाली काढायची असल्यास मनपाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वाहतुकीची कोंडी
ही समस्या कायमस्वरूपी निकालात निघावी म्हणून महापालिकेने हॉकर्स झोन निर्मितीचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रत्यक्षात कृती होत नसल्याने हा प्रश्‍न प्रलंबित आहे. इच्छा नसतांनाही लोटगाडीधारकांना रस्त्यावर उभे रहावे लागते. आग्रारोडवरील अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोरील जागा किरकोळ विक्रेत्यांना मासिकदराने वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय मनपाच्या बाजार फी वसुलीचा ठेका दिलेला असल्याने ठेकेदाराचा माणुसही प्रती गाडी प्रती दिन दहा रूपये वसुली करीत असतो.