रावेर। शहरातील माऊली नगर तसेच विश्वकर्मा नगरात जबरी चोरी करुन सुमारे 1 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना शनिवार 15 रोजी उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याचे उघडकीस आल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण आहे. माऊली नगरात शनिवारी 15 रोजीच्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास यमुनाबाई निवृत्ती पाटील यांच्या घरात पहिल्या लोखंडी दरवाजाची बारीक जाळीला होल केले व त्यांची सिकनी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर मंगला रायपुरकर यांना जाग आली असता चाकुचा धाक दाखवून त्यांच्या कडील 27 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, 16 हजार किंमतीच्या सोन्याच्या बाल्या 5 हजार किमतीचे सोन्याचे चापे असे एकूण 48 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागीने घेऊन चोरटे पसार झाले.
विश्वकर्मा कॉलनीतही 69 हजाराचे ऐवज लंपास
तसेच विश्वकर्मा कॉलनीतही राजेद्र आत्मराम चौधरी यांच्या घरातही चाकुचा धाक दाखवून जबरी चोरी केली. यामध्ये 30 हजार रोख 39 हजाराचे सोन्याचे दागिने असा एकुण 69 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत दोघांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयां विरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
श्वान पथकाद्वारे केली पाहणी
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याठिकाणी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाद्वारे संपुर्ण परिसरात पाहणी करण्यात आली. मात्र श्वानाने परिसरात घिरट्या घातल्याने चोरटे कोणत्या मार्गाने घराकडे दाखल झाले होते तो मार्ग कळू शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरातील चोर्यांचे सत्र थांबले होते. मात्र आता पुन्हा एकाच दिवसी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोेरट्यांनी रात्रीच्या वेळेस धाड टाकून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिणे असा एकूण 1 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली यामुळे चोरट्यांनी पुन्हा तोंड वर काढले असल्याचे दिसून येत असून यामुळे पोलीसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
रात्री गस्त घालण्याची मागणी
चोरट्यांनी या घटनेत चाकूचा वापर केला असल्याचे महिलांनी सांगितले आहे. मात्र भितीपोटी महिलांनी या चोरट्यांना विरोध केला नाही. या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास लावून चोरट्यांना जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. तसेच या भागात रात्रीच्या वेळेस गस्त घालण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत फिरणार्या संशयीतांची झडती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे.