पोलीसांनी कठोर भुमिका घेण्याची आवश्यकता

0

रावेर। कायद्याचा वचक राखण्यासाठी पोलिसांनी अधिक नरमाईची भूमिका घेता कठोर भूमिका घ्यावी. प्रसंगी गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवलाच पाहिजे, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असे नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी सांगितले. येथील पोलिस ठाण्यात डीवायएसपी अशोक थोरात, निरीक्षक कैलास काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नायब तहसीलदार सी.एच.पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे पंकज वाघ, रामनवमी उत्सव समितीचे सुरेश शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दिलीप कांबळे, अ‍ॅड.योगेश गजरे, सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस कर्मचारी श्रीराम पाटील यांचा बैठकीत गौरव करण्यात आला. डीवायएसपी थोरात यांनी, कर्मचार्‍यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. तसेच पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. कुणी काही तक्रार केल्यास त्याची शहानिशा करुन त्यावर लागलीच कारवाई करण्याच्या सुचना देखील यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांना दिल्या.

सामाजिक सलोखा जपावा
पोलीस पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी, काही अपप्रवृत्ती जाणूनबुजून वैयक्तिक फायद्यासाठी कलुषित विचाराने शहरातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पोलिस अशांना भिक घालत नाहीत. नसते उपद्व्याप केल्यानंतर कोर्टाच्या खस्ता खाव्या लागतात. त्यामुळे शहरातील सामाजिक सलोखा जपण्याचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे, असे ते म्हणाले. तसेच मध्यंतरी झालेल्या दंगलीचा कंलक मिटवून रावेर शहर आता प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार काढले. यासाठी मेहनत घेणार्‍या पोलिसांचेही कौतुक केले.