पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

0

फैजपूर। रावेर तालुक्यातील सुलवाडी येथे अवैध माती उत्खनन केले जाते. या गौण खनिज तस्करांना निंभोर्‍याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम पाठिशी घालतात. त्यांच्यावर कारवाई करावे, या मागणीसाठी सुलवाडी सरपंच शीतल जोगी यांनी फैजपूर प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस होता.

पोलिसांकडून मिळाली अपमानास्पद वागणूक
सुलवाडी येथे 400 ते 500 ब्रास मातीची कोणतीही परवानगी घेता वाहतूक सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण होत असल्याची शंका सरपंच जोगी यांनी व्यक्त केली आहे. अवैधरित्या सुरु असलेल्या उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडत असून या उत्खननास आळा घालण्यात यावा तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी देखील जोगी यांनी केली आहे.

सरपंच जोगी यांनी या प्रकाराला मज्जाव केला असता दोघांनी जोगी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या याप्रकरणी तक्रारीसाठी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. येथे सहायक निरीक्षक कदम यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत हाकलून लावले. त्यामुळे कदम यांच्यावर कारवाई करावी, यासाठी जोगी यांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन यांनी त्यांची भेट घेतली.