पोलीस अधिकार्‍याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी आारोपी मुलाला अटक

0

मुंबई । खार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांची पत्नी दीपाली ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या हत्येचा आरोप असलेला त्यांचा मुलगा सिद्धांत ज्ञानेश्‍वर गणोरे याला राजस्थानच्या जोधपूर शहरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी वाकोला पोलिसांचे एक विशेष पथक जोधपूरला रवाना झाले असून उद्यापर्यंत त्याला मुंबईत चौकशीसाठी आणण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. सिद्धांतवर त्याचीच आई दीपाली गणोरेची हत्या केल्याचा आरोप असल्याने त्याला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

या हत्येमागे आई आणि मुलामध्ये शिक्षणावरुन असलेला वाद कारणीभूत असला तरी त्याच्या चौकशीतून या हत्येमागील अधिकृत सत्य बाहेर पडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे हे सांताक्रुज येथील प्रभात कॉलनीत राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच मुलाने त्यांची पत्नी दीपाली यांची घरातून चाकूने गळ्यावर आणि हातावर वार करुन हत्या केली होती. या हत्येनंतर सिद्धांत हा कपाटातील सुमारे दोन लाख रुपये घेऊन पळून गेला होता. हा प्रकार रात्री उशिरा दिवसपाळी करून घरी आलेल्या ज्ञानेश्‍वर गणोरे यांना समजताच त्यांनी वाकोला पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर वाकोला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांचा मृतदेह नंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयात पाठविण्यात आला होता. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या स्वाधीन करण्यात आला. दिपाली यांच्या पार्थिवावर नाशिक येथील गावी अंत्यसंस्कार होणार असल्याने सायंकाळी त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला. तिथेच त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे वाकोला पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सिद्धांतचा शोध सुरू केला होता. त्यासाठी चार ते पाच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच सिद्धांत हा राजस्थानच्या जोधपूर शहरात स्थानिक पोलिसांना सापडला. तोच सिद्धांत असल्याची पक्की खात्री होताच त्याच्या अटकेची माहिती वाकोला पोलिसांना कळविण्यात आली होती. त्यानंतर वाकोला पोलिसांचे एक विशेष पथक जोधपूरला रवाना झाले आहे. त्याला उद्यापर्यंत मुंबईत चौकशीसाठी आणले जाईल आणि नंतर वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.