पोलीस अधीक्षकांकडून शहर वाहतूक शाखेत झाडाझडती

0

दिशाभूल करणार्‍या वाहतूक शाखेतील सहायक फौजदारासह तिघे कर्मचारी मुख्यालयात जमा

जळगाव : शहर वाहतूक शाखेला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी शनिवारी अचानकपणे सरप्राईज भेट दिली. यादरम्यान त्यांनी हजेरीपुस्तकासह कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांची जबाबदारीबाबत चौकशी केली. तसेच पोलीस निरिक्षकांकडून फोनवरुन माहिती घेतली. निरिक्षक व कर्मचारी अशा दोघांच्या माहिती विसंगती आढळून आल्याने दिशाभूल करणार्‍या वाहतूक शाखेतील सहायक फौजदारासह तिघांवर कारवाई करत अधीक्षक डॉ. उगले यांनी मुख्यालयात जमा केले आहे. अधीक्षकांच्या भेटीने वाहतूक शाखेत एकच खळबळ उडाली होती.

निरीक्षकाच्या दालनाची तपासणी
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले हे शनिवारी सकाळी कार्यालयात येत असताना अचानक शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात गेले. ठाणे अमलदार म्हणून जरीना तडवी यांची ड्युटी होती, मात्र प्रत्यक्षात त्या ड्युटीवर नव्हत्या. त्यांच्या जागी संघपाल तायडे काम करीत होते. तायडे यांना तुमची ड्युटी काय? असे विचारले असता त्यांच्या उत्तरात विसंगती आढळून आली. श्रीखंडे यांच्याकडूनही कसुरी झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.पंजाबराव उगले यांनी निरीक्षक देविदास कुनगर यांच्याही दालनाची तपासणी केली. टेबल, त्यांचे ड्रावर तसेच ठाणे अमलदार व हजेरी मास्तर यांच्या ड्रावरची तपासणी केली. ठाणे अमलदार, ऑफीर हजर व आरपीएसओ यांच्या ड्युटीबाबत निरीक्षक कुनगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. कुनगर यांनी दिलेली माहिती व कर्मचार्‍यांकडून मिळालेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने तिघांवर कारवाई करण्यात आली.

ट्रक चालकाकडून कर्मचार्‍याने घेतले होते पैसे
मुख्यमंत्री दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी डॉ.पंजाबराव उगले अमळनेर येथे जात असताना प्रभात चौकात सुनील नाईक यांनी एक ट्रक चालकाला अडविल्याचे दिसून आले. डॉ.उगले यांनी पुढे गेलेल्या ट्रक चालकाला थांबवून पोलिसाने काय कारवाई केली याची चौकशी केली असता वाहतूक पोलिसाने पैसे घेतल्याचे सांगून हा प्रकार नेहमीचाच असल्याचे पोलीस अधीक्षकांना सांगितले. त्यामुळे या प्रकाराने संतापलेल्या पोलीस अधीक्षकांनी तीन दिवसांपूर्वी सुनील नाईक यांनाही मुख्यालयात जमा केले. दरम्यान याचप्रकारामुळे शनिवारी अधीक्षकांनी झाडाझडती घेतल्याची चर्चा होती.