‘पोलीस आपल्या दारी’ असा अनोखा उपक्रम

0
देहूरोड पोलीस हद्दीत ठिकठिकाणी तक्रार पेट्या
देहूरोड : प्रत्येकवेळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणे शक्य नसते. त्यामुळे तक्रार असूनही ती काही कारणास्तव दाबून ठेवावी लागते, अशी अनेकदा अवस्था होते. अशा तक्रारी मनमोकळेपणाने पोलिसांकडे याव्यात, नागरिकांना भयमुक्त वाटावे यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पोलीस आपल्या दारी असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यात नागरिकांच्या सुविधेसाठी गृहसंकुले, वसाहती, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात तक्रार पेट्या लावल्या आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा दहा तक्रारपेटया लावण्यात आल्या आहेत.
पोलीसांबद्दलची अनावश्यक भीती कमी व्हावी, नागरिकांचा पोलीसांशी सुसंवाद व्हावा या उद्देशाने नागरिक, विशेषतः महिला व युवतींसाठी सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांच्या ठिकाणी पोलीसांच्यावतीने तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत. देहूरोड परिसरात सध्या देहूरोड शहर, किवळे, रावेत, देहुगाव, दुर्गादेवी उद्यान आदी ठिकाणी सुमारे दहा पेट्या लावण्यात आल्या आहेत.
वाहतूक विषयक तक्रारीही
महिला व तरूणींचे छेडछाडीचे प्रकार, अपमानास्पद शेरेबाजी व अन्यप्रकारचा त्रास असल्यास या तक्रारपेटीत तक्रार करता येणार आहे. पोलिसांकडून या तक्रारपेटीतील तक्रारी गोळा करून त्याची दखल घेतली जाणार आहे. यामध्ये लहान मुलांच्याबाबत लैंगिक अत्याचार, विद्यार्थ्यांबाबत रॅगींग, दादागिरी, गैरमार्गाला प्रवृत्त करणार्‍या व्यक्ती, अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन, सायबर विषयक, लैंगिक अपराध आदी तक्रारींचा समावेश आहे. वाहतूक विषयक तक्रारीही नागरिकांना देता येतील. यामध्ये बेदरकारपणे वाहन चालविणे, प्रेशर हॉर्न किंवा विचित्र आवाजाचे हॉर्न वाजविणे, जादा प्रवासी भाडे आकारणे, उर्मट भाषा किंवा गैरवर्तन, जादा प्रवासी किंवा विद्यार्थी वाहतुक व यासंबंधी इथर तक्रारींचा यात समावेश आहे. तक्रार पेट्या लावण्यात आलेल्या ठिकाणी ही माहिती असलेले फलकही पोलिसांच्यावतीने लावण्यात आले आहेत.
पोलिसांचे आवाहन
या तक्रार पेट्या फिरत्या राहतील. आता आहे त्यानंतर पुढील पाच दिवसांत त्या दुसर्‍या भागात लावण्यात येतील. त्यानंतर पुन्हा पुर्वीच्या जागी लावल्या जातील, अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली. नागरिकांनी बिनदिक्कत व निर्भयपणे आपल्या तक्रारी या तक्रार पेटयांमध्ये टाकाव्यात, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले आहे.