रोजच्या वाहतूक कोंडीवर हिंजवडीकर बोलू लागले

0
पोलीस आयुक्तांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली चक्राकार वाहतूक
सुरळीत वाहतुकीसाठी अडथळे आणि सूचना
पिंपरी : हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवासी, कामगार, आयटीयन्स सर्वांनाच मोठ्या त्रासाला रोजच सामोरे जावे लागत आहे. वृत्तपत्रांमधून येणार्‍या बातम्यांमुळे हा विषय गंभीर असल्याची जाणीव सर्वांनाच झाली. याबाबत विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. नवीन पोलीस आयुक्तांनी मागील दोन दिवसांपूर्वी हिंजवडीमधील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक चक्राकार पद्धतीने सुरू केली आहे. हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा आहे असून नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येत आहेत. याबाबत माहिती तंत्रज्ञात कर्मचारी आणि स्थानिक हिंजवडीकर बोलू लागले आहेत. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे.
हिंजवडीमधील शिवाजी चौकातून दररोज सुमारे दोन ते अडीच लाख वाहने धावतात. पावसाळा सुरु असल्याने नागरिकांनी व आयटी कामगारांनी दुचाकी वापरणे बंद केले असून प्रत्येकजण चारचाकी वाहन घेऊन येत आहे. त्यामुळे सुमारे तीस टक्के वाहनांची संख्या वाढली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पडलेली वाहनांची भर आणि खराब, अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. यातून वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रत्येक हिंजवडीकर सांगत आहे.
आयटीयन सिद्धार्थ नाईक म्हणाले की, हिंजवडीमध्ये वाहतुकीची समस्या अत्यंत बिकट होत आहे. त्यात येत्या काही दिवसात मेट्रो आणि रस्त्यांचे काम सुरु होणार आहे. सध्या ही अवस्था असेल तर काम सुरु झाल्यानंतर अतिशय बिकट अवस्था होईल. रस्ते कमी पडतील. आहे त्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करायची असेल तर वाहतुकीची शिस्त महत्वाची आहे. यासाठी कोणी एक व्यक्ती अथवा संस्था जबाबदार नसून हिंजवडीशी जोडलेला प्रत्येक घटक कारणीभूत आहे. एकेरी वाहतूक केली तरी चालू शकेल परंतु यामुळे हिंजवडी फेज वन चौकात भूमकर चौकातून येणारी, शिवाजी चौकातून येणारी, माण रोडने येणारी आणि अन्य एका मार्गाने येणारी अशी सहा लेनवरील वाहने एकत्र होत आहेत. फेज वन चौकातून जॉमेट्रिक चौकापर्यंत दोनच लेन आहेत. त्यामुळे सहा लेनवरील वाहने दोन लेनवर बसणारच नाहीत. परिणामी वाहनांच्या रांगा लागतील, ही बाब प्रशासनाने लक्षात घ्यायला हवी.
आयटी कंपन्या आणि प्रशासनाच्या पुढाकारातून सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी, रस्त्यांची गुणवत्ता सुधारणे, वाहतुकीची शिस्त पाळायला हवी, बंद पडलेल्या वाहनांसाठी ठराविक अंतरावर टो-व्हॅन असावी, नागरिकांसोबत सुसंवाद वाढवायला हवा, हिंजवडीकडे येणार्‍या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करावे आदी महत्वाच्या सूचना हिंजवडीकरांनी केल्या आहेत.