राज्यातील 95 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या
पिंपरी- नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील मकरंद देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. मकरंद रानडे यापूर्वी अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर येथे कार्यरत होते. त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्त या नवनिर्मित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 27) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील राज्यातील 95 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तडफदार अधिकारी लाभले
नम्रता पाटील यापूर्वी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) पदावर कार्यरत होत्या. तर विनायक ढाकणे पोलीस उपायुक्त, औरंगाबाद शहर येथे कार्यरत होते. दोन्ही तडफदार पोलीस अधिकारी उपायुक्त म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत. या निवडीनंतर पोलीस आयुक्त म्हणून कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज
दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकीकरण वाढते आहे. त्यामुळे उद्योगधंदे वाढत आहेत. त्यामुळे येथील गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साखळी चोरी, पाकिटमारी, किरकोळ मारहाण, खून, चोर्या आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ठिकठिकाणी वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार तर सारखेच होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज होती. अनेक वादविवादानंतर आता हे आयुक्तालय चिंचवडमधील प्रेमलोक पार्कमधील महात्मा फुले शाळेमध्ये सुरू होणार आहे.