15 ऑगस्टपूर्वीच सुरू होण्याची शक्यता
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, पोलीस आयुक्तालयाला शासनाकडून अद्याप मंजुरी मिळाली नव्हती. अखेर सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्याची अधिसूचना शासनाकडून जारी करण्यात आली. पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहर हे महत्त्वाचे असल्याने या शहरासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचा आधिकारी नेमण्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांकडून आयुक्तालयाची मागणी
वाढती गुंडगिरी, औद्योगिक क्षेत्रातील खंडणीखोरी, नागरिकांच्या वाहनांची तोडफोड अशा घटनांमुळे पिंपरीतील कायदा-सुव्यवस्थेची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापना करण्यात यावे, अशी मागणी नागरिक तसेच सामासामाजिक कार्यकर्त्यांकडून राजकीय नेत्यांकडे करण्यात आली होती. दीड वर्षांपुर्वी मुख्यमंत्री फडणवीस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लवकरच सुरु केले जाईल, असे जाहीर केले होते. तेव्हापासून पिंपरीसाठी आयुक्तालय सुरु करण्याच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात येत होता.
नवीन पदे निर्माण होणार
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आठ महिन्यांपूर्वी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव सादर केला होता. पिंपरीसाठी दोन हजार 633 नवीन पदे निर्माण करावी लागणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव 1 मार्च रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. नवीन पदे तसेच खर्चास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील चौदा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नेमणूक पिंपरीसाठी करण्यात आली होती.त्यानंतर सोमवारी पिंपरीसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबची अधिसूचना जारी करण्यात आली.
आयुक्तालयात 15 ठाणी
पुणे शहर पोलीस दलात असलेले वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, हिंजवडी या पोलीस ठाण्यांचा समावेश पिंपरी आयुक्तालयात करण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील चाकण, आळंदी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी हा भाग समाविष्ट करण्यात येणार आहे. नवीन आयुक्तालयात एकूण मिळून पंधरा पोलीस ठाणी राहणार आहेत. ग्रामीण तसेच पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी नवीन आयुक्तालयात वर्ग केले जाणार आहेत.
नागरिकांना उत्कंठा
त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय 15 ऑगस्टपूर्वीच सुरु होणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नवीन आयुक्तालयामुळे गुन्ह्यांना प्रतिसाद देण्यासाठी तसेच प्रभावी अंमलबजावणी करून कायदा व सुव्यवस्था राखणे अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे आयुक्तालय कधीपासून सुरु होणार अशी उत्कंठा पिंपरी-चिंचवडकरांना लागली आहे.