पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना राज्य आयोगाचे समन्स

0

पोलिसांनी स्थानबध्द करून माझ्या मुलभूत हक्कांवर गदा आणल्याचा भापकर यांचा आरोप

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर स्थानबध्द प्रकरण

पिंपरी । राज्य मानवी हक्क आयोगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना समन्स बजावले आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी घरातच स्थानबध्द केल्यामुळे हा समन्य बजावण्यात आला. भापकर यांच्या तक्रारीनंतर सोमवारी सकाळी अकरा वाजता आयुक्त पद्मनाभन यांना आयोगापुढे हजर रहावे लागणार आहे.

भापकर यांच्या आंदोलनाची धास्ती…

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाजपचा राज्य कार्यकारिणी मेळावा 26 आणि 27 एप्रिल 2017 रोजी झाला होता. तसेच, अटल संकल्प महासंमेलन 3 नोव्हेंबर रोजी निगडी येथे आयोजित केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तत्पुर्वी, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. भापकर यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन पोलिसांनी दोन्हीवेळी त्यांना त्यांच्या घरी स्थानबध्द केले होते.

सोमवारी होणार सुनावणी…

पोलिसांनी स्थानबध्द करून माझ्या मुलभूत हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करत भापकर यांनी पोलिसांविरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना येत्या सोमवारी (दि. 16) सुनावणीसाठी आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता यावर सुनावणी होणार आहे. यामध्ये तत्कालीन अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पिंपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, निगडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.