भुसावळ। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत लांबलेल्या उपअधीक्षक कार्यालयाच्या स्थलांतराला अखेर सोमवार, 14 रोजीचा मुहूर्त गवसला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह नियंत्रण कक्ष व तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज एकाच इमारतीतून चालणार आहे. शहरातील भाजी बाजारानजीक असलेल्या तालुका पोलीस ठाण्याची इमारत तालुक्याभरातून येणार्या नागरिकांना गैरसोयीची ठरत होती शिवाय जागेचा अभाव असल्याने गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल ठेवण्यासदेखील मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे तत्कालीन अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात जामनेर रोडवरील साई मंदिरासमोरील प्रशस्त जागेवर सुमारे दिड वर्षांपूर्वी एकाच छताखाली तीन कार्यालये असलेल्या इमारतीचे व पोलीस वसाहतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
उद्घाटनाअभावी रखडले स्थलांतर
तांत्रिक अडचणींमुळे मध्यंतरी इमारतीचे काम रखडले होते मात्र संबंधित मक्तेदाराला पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक रक्कम आकारणे सुरू झाल्यानंतर इमारतीची रंगरंगोटी तसेच फर्निचर आदी कामे पूर्ण करण्यात आली मात्र तीन ते चार महिने उलटूनही स्थलांतराला मुहूर्त गवसत नव्हता अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इमारत उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
एकाच इमारतीत तीन कार्यालयांचे कामकाज
जामनेर रोडवरील प्रशस्त एकाच इमारतीत पोलीस उपउपअधीक्षक कार्यालयासह नियंत्रण कक्ष व तालुका पोलीस ठाण्याचे कामकाज चालणार आहे. भुसावळ तालुक्यातील खेडेगावातील नागरिकांची यामुळे काहीशी सोय होणार आहे शिवाय गावात येण्यासाठी खर्च व वेळ त्यामुळे वाचण्यास मदतही होणार आहे.