पोलीस उपनिरीक्षकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0

शिरपूर। शिरपूर शहरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती दिनी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत एकमेकांशी झोंबाझोंबी करीत असलेल्या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर खुली तलवार काढून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पाच तरूणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीघांना अटक करण्यात आली आहे.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शनिवारी शिरपूर शहरात क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती दिनाचे औचित्यसाधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री शहरातील बस स्थानक परिसरात पोहोचली असतांना स्वप्नील छत्रपती राजपूत रा.दहिवद, मनोज पदमसिंग राजपूत रा.सुळे, हितेश प्रविणसिंग राजपूत रा.करवंद, शिवा राजपूत रा.दहिवद, योगेश ईश्‍वर राजपूत रा.आमोदा हे एकमेकांशी झोंबाझोंबी करीत असतांना मिरवणूकीच्या बंदोबस्तासाठी असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश वासुदेव गुजर यांनी त्यांना हटकले. याचा राग आल्याने ते शासकीय कर्तव्य बजवित असतांना आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करीत दमदाटी करून तलवारीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली तर शिवा राजपूत याने खुली तलवार काढून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक मुकेश गुजर यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाचही जणांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल वडनरे हे करीत आहेत. यातील स्वप्निल राजपूत, मनोज राजपूत, हितेश राजपूत यांना अटक करण्यात आली आहे.