जळगाव (किशोर पाटील) – रॅगिंग या शब्दाचा अर्थ एखाद्याची आक्रमकपणे मजा घेणे, असा होतो. महाविद्यालय, शाळांमधील विद्यार्थ्यांची त्यांच्या सिनिअर्सकडून घेतली जाणारी मजा, अपमानित करण्याचा प्रकार म्हणजेच रॅगिंग. एकप्रकारे संबंधिताचा मानसिक व शारीरिक छळ, असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. त्यामुळे या प्रकाराविरोधात कायद्यान्वये शिक्षाही होते. मात्र आतापर्यंत केवळ महाविद्यालय, शाळांमध्ये असलेला हा प्रकार आता शासकीय कार्यालयांमध्येही पाहावयास मिळत आहे. त्याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस दलातही वरिष्ठ अधिकार्यांकडून हाताखालील कर्मचार्यांना दिली जात असलेली वागणूक, छळ सर्वश्रूत आहे. कारण याच शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस निरिक्षकाने छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडवून दिली होती.
त्या पोलीस निरिक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत दोन अधिकार्यांची नावे समोर आले होते. वरिष्ठांच्या जाचामुळे एका पोलीस अधिकार्यावर आत्महत्या करण्याची वेळ यावी हे अधोरेखित झाल्याने वरिष्ठ व कर्मचार्यांमध्ये होणारा वाद प्रसारमाध्यमांमुळे राज्यभर पसरला. यापूर्वी अशा पध्दतीने जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाल्याचे ऐकिवात नाही. या गंभीर घटनेनंतर हा प्रकार कमी होईल, थांबेल अशी अपेक्षा जनसामान्यांसह पोलिसांना होती. मात्र, तालुका पोलीस ठाण्यात नुकताच एका महिला पोलीस कर्मचार्याने हजेरी मास्तरच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस दलात अद्यापही वरिष्ठांकडून कर्मचार्यांना दिला जाणारा त्रास सुरुच असल्याचे समोर आले आहे. ड्युटी लावणे, रात्री अपरात्री बोलावणे, मनासारखी रजा हवी असेल तर त्यासाठी पैशांची मागणी करणे आदी माध्यमातून कर्मचारी पुरुष असो की, महिला दोघांचा सारखाच शारीरिक व मानसिक छळ राजरोसपणे सुरु आहे. काही जण नोकरीवरुन काढून टाकण्याच्या भीतीने हा छळ निमूटपणे सहन करतात, तर काही जण आवाज उठवितात. मात्र यानंतरही संबंधित दोषींवर होणारी थातुरमातूर कारवाई ही चितेंची बाब आहे. त्याचमुळे पोलीस दलातील छळ करणार्या मुजोर अधिकार्यांची, वरिष्ठांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे.
सद्रक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीदवाक्यानुसार 24 तास कर्तव्य बजावणारा अशी पोलिसाची ओळख आहे. त्याला कुठलाही सण नसतो. कुटुंबाला वेळ देता येत नाही. या मानसिक त्रासात रोज जगणार्या कर्मचार्याला त्याच्याच वरिष्ठाकडून चुकीची वागणूक मिळत असेल, या विरोधात आवाज उठवूनही अपेक्षित कारवाई होत नसेल तर पीडित कर्मचार्याने आत्महत्येचे पाऊल उचलले यात तो दोषी कसा? त्याला हे कृत्य करण्यास भाग पाडणारा विभाग व वरिष्ठ तितकेच दोषी आहेत. दिवसरात्र काम करणार्या पोलीस कर्मचार्याला जर आपण आनंद देवू शकत नसाल तर त्या कर्मचार्याला दुःख देण्याचा अधिकारही वरिष्ठांना कुणी दिला दिला? मानसिक त्रासात काम करताना कर्मचार्याकडून काही चूक होत असेल व त्यासाठी त्याला शिक्षा मिळत असेल यासारखी दुसरी शोकांतिका ती कोणती? कर्मचार्यांवर वरिष्ठांचा धाक असावा पण त्याला विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देणे एक प्रकारची हिटलरशाही होय.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था नांदायची असेल तर सर्वांनी सोबत येवून काम करणे गरजेचे आहे. तसे वातावरण असणे गरजेचे आहे. सर्वांसाठी नियम सारखेच हवेत. नूतन पोलीस अधीक्षकांनी कर्मचार्यांचा विनाकारण छळ करणार्या वरिष्ठांविरोधात कठोर व कडक धोरण राबवावे. त्यामुळे वेळीच हिटलरशाही प्रवृत्ती ठेचली जाईल आणि कुणीही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी असो, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येची वेळच येणार नाही.