धुळे । शहरातील चाळीसगाव रोड पवन नगर भागातील म्हाडाच्या सुमारे 3 एकर जागेवर सुसज्ज पोलिस ठाण्याची इमारत तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पोलिस कर्मचार्यांसाठी घरे बांधणार असल्याचे सांगत या कामांना मंजुरी मिळाली असुन येत्या नागपुर विधानसभा अधिवेशनात साडेचार कोटीचा निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी विकासकाम पाहणी दौर्यावेळी दिली आहे. धुळे शहरात करीत असलेल्या विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांसह पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी पांझरा किनारचे रस्ते, ब्रिजकम बंधाराचे काम, आझादनगर पोलिस ठाण्याच्या इमारतीची आणि चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे प्रस्तावित जागेची पाहणी करुन आमदार गोटे यांनी माहिती दिली.
साडेचार कोटी मिळाले
पोलिस ठाण्यासाठी तसेच पोलिसांच्या घरकुलांसाठी जमिन मिळवली असली तरी अद्याप बांधकामासाठी साडेचार कोटींचा निधी मिळवायचा आहे. तो निधी आपण येत्या नागरपूर अधिवेशनावेळी मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले. तसेच या वसाहतीत पोलिस कर्मचार्यांसाठी वन बिएचके, टु-बिचके अशी घरे बांधली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.
विकत घेण्याचीही सोय
पोलिस कर्मचारी जर घरे विकत घेवू इच्छित असतील तर तशी व्यवस्थाही त्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल अशीही माहिती आमदार गोटे यांनी यावेळी दिली. त्याच्या या पाहणी दौर्यावेळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल नेरकर, भिमसिंग राजपुत, तेजस गोटे, संजय बगदे, अमोल सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
जमीन खरेदी
चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी गृह विभागाने या ठिकाणच्या म्हाडाची मालकी असलेल्या 60 आर भुखंडापैकी 10 हजार चौरस फुट जमिन 28 लाखात विकत घेतली आहे. या जागेवर चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारत, डीवायएसपी कार्यालय उभारले जाणार आहे. तसेच उर्वरित जागा म्हाडाला विकता येत नाही, त्यामुळे उर्वरित जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पोलिस कर्मचार्यांसाठी घरकुले बांधण्यात येणार आहेत. या कामांना मंजुरी मिळालेली आहे.