पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची झाली दयनिय अवस्था

0

रावेर। कायदा- सुव्यवस्था राखताना अनेकवेळा स्वत:च्या जीवाची बाजी लावणारे आणि प्रसंगी जनतेची टीका झेलणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना शासनाकडून पुरेशा सोयीसुविधा पुरवल्या जातात का? त्यांचे कौटुंबिक स्वास्थ? हा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहतो.

रावेर शहरदेखील त्यास अपवाद नाही. येथील पोलिस वसाहतीची अत्यंत वाइट स्थिती असून 36 पैकी केवळ 16 निवासस्थाने रहिवासायोग्य आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
‘कामाचा व्याप तरीही सोयी सुविधा तोकड्याच
रावेर पोलिस स्टेशनमध्ये सध्या 40 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्यावर 59 गावांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. म्हणजेच कामाच्या तुलनेत ही संख्या तोकडी आहे. शिवाय या कर्मचार्‍यांकडून चांगल्या कामाच्या ढिगभर अपेक्षा असतात. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते लोकप्रतिनिधींची मर्जी खप्पा होणार नाही याची दक्षता घेत जनतेचाही रोष ओढवणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पोलिस वसाहतीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 36 निवासस्थानांना 100 पेक्षा जास्त वर्षे झाली असल्यामुळे या घरांचा ठिकठिकाणी तडा गेल्या आहेत. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर वसाहतीचा प्रश्न मार्ग लावणार आहे.

नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक, रावेर

आश्‍वासन पुर्ण होईना
घरांची अवस्था बिकट असून सध्या केवळ 16 घरे रहिवासायोग्य आहेत. मात्र, या 16 कुटुंबांना पावसाळ्यात गळती आणि परिसरातील चिखलामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान, पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे, तत्कालिन एसपी एस. जयकुमार, डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलिस निवासस्थानाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी ठरली. पावसाळ्यात या घरांमध्ये अनेक वेळा साप, विंचू निघतात. यामुळे महिला लहान मुलांमध्ये भीती पसरते. ही घरे अतिशय जुनी असल्यामुळे भिंतींना ठिकठिकाणी तडा गेलेल्या आहेत. पावसाळ्यात या भिंती कोसळण्याची भिती असून परिसरावातील सदस्यांना याठिकाणी आपला जीव मुठीत घेऊन रहिवास करावा लागतो.