पोलीस चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत धमकी

0
काळेवाडी : चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाने पोलीस चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी पोलीस चौकीत मंगळवारी (दि. 25) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. इम्तियाज बरकतअली आत्तार (वय 34, रा. परमवीर कॉलनी, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेश विनायकराव बारकुले (वय 35) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आरोपी हॉटेलचा भागीदार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी फिर्यादी पोलीस नाईक बारकुले काळेवाडी पोलीस चौकीत ड्युटी अंमलदार मदतनीस म्हणून कार्यरत होते. त्यावेळी कोहिनुर हॉटेलचे व्यवस्थापक पवनसिंग सताराम यादव यांनी ते काम करत असलेल्या हॉटेलचा भागीदार मालक सुरज देविदास कांबळे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉटेलचा दुसरा भागीदार आरोपी इम्तियाज याला पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की करत पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली. यावरून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुदळ तपास करीत आहेत.