पोलीस : जनतेचा रक्षक

0

पोलिसांच्या वर्दीतील माणूस पाहिला की, समोरचा व्यक्ती जरा दचकून वागतो. तीच व्यक्ती जर साध्या ड्रेसमध्ये समोर आल्यास तेवढे काही वाटत नाही. पोलिसांना पाहिल्यावर चोरांना तर भीती वाटतेच शिवाय सामान्य माणसालादेखील जरासी भीती वाटते. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासन काम करत असते. सैनिक देशाचे संरक्षण करतात, तर पोलीस देशातील लोकांचे. म्हणूनच पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे आहे, याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुष्टाचा संहार. पोलीस विभागात पोलीस महासंचालक ते हवालदारपर्यंत वेगवेगळी पदे असतात आणि सर्वांना वेगवेगळी कामे विभागून दिली जातात. त्यात पोलीस हे एकच पद सर्वांना ओळखीचे आहे. ग

ावात किंवा शहरात कुठे छोटी-मोठी घटना घडली की, आपण सहज म्हणतो, यावर पोलिसांचे काही लक्ष नाही. चोरांच्या घटना वाढल्या की, चोरांचे आणि पोलिसांचे सूत जुळलेले आहे अशा बातम्या वाचण्यात येतात. अवैध धंदे किंवा काही अवैध बाबी घडू लागले की पोलिसांवर ओरड निश्‍चितपणे केल्या जाते. म्हणजे आपण समजू शकतो की, पोलिसांवर किती मोठ्या जबाबदारी असतात. एवढे मात्र खरे आहे सामान्य माणूस कितीही ओरडला तरी काही लोक त्यास दाद देत नाहीत. मात्र, पोलीस नुसते लाठी जरी जमिनीवर आदळली तरी त्यांना लगेच प्रतिसाद मिळतो. पोलिसांनी याच बाबींचा फायदा घेऊन समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. समाजानेसुद्धा त्यांना साथ देणे आवश्यक आहे. पोलीस याविषयी समाजात फार पूर्वीपासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून भीती पसरवण्यात आली. पोलीस हे भ्रष्टाचारी आणि वेगळ्या प्रवृत्तीचे असतात असे चित्र निर्माण करण्यात चित्रपटाचा सिंहाचा वाटा आहे. लोकसंख्येच्या ज्या प्रमाणात पोलीस असायला हवे त्या प्रमाणात पोलीस सध्या कार्यरत नसल्यामुळे आजच्या पोलिसांवर कामाचा तणाव दिसून येत आहे. वास्तविक पाहता आठ घंटे ड्युटी करून ते मोकळे होतात. मात्र, काही वेळा इमर्जन्सी असते की, ओव्हर टाइम ड्युटी करावी लागते.

गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि समाजातील लोकांना मानसिक समाधानासाठी पोलीस खूप आवश्यक आहेत. ग्रामीण भागात, खेड्यात वाद, तंटे याचे प्रमाण वाढीस लागतात. यावर उपाय म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती योजना तयार केली ज्याद्वारे गावातील वाद, तंटे गावातच मिटवले जावे. यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. जनतेनी आपली समस्या पोलिसांना सविस्तर सांगायला हव्या आणि पोलिसांनी त्यांची समस्या ऐकून त्यावर काही कार्य करायला हवे. पूर्वी पोलीस खात्यात महिलांची संख्या नगण्य होती. मात्र, भारतात पहिली महिला आयपीएस किरण बेदी यांनी जेव्हा या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हापासून या क्षेत्रात महिलांची काम करण्याची संख्या वाढू लागली. आज अनेक महिला या क्षेत्रात विविध पदांवर राहून आपले काम पूर्ण करत आहेत.

-नागोराव सा. येवतीकर
सामाजिक कार्यकर्ते ता. धर्माबाद
9423625769