लखनौ : शनिवारी रात्री आग्रा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अटकेत असलेल्या समर्थकांना सोडवण्यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी परिसरातील पोलिसांची वाहनेही पेटवून दिली. फतेहपूर सिक्रीचे आमदार उदयभान सिंह आणि त्यांचे समर्थक आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते, अशी माहिती आग्रा शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुशील चंद्रभान यांनी दिली.
आंदोलन करणारे सर्वजण बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. तत्पुर्वी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी मुस्लिम लोकांना मारहाण केल्याचा आरोप होता. त्याचा विरोध करण्यासाठी काही लोक पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी हा गुन्हा रद्द करून अल्पसंख्याक समुदायाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षकांबरोबर गैरवर्तन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले. त्या लोकांना सदर बाजार पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार हे शहागंज ठाण्यातून घरी परतत असताना आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्लेखोरांनी समर्थकांना तुरूंग तोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.