किशोर पाटील
जळगाव शहरासह भुसावळ शहरातील खूनाच्या घटनेने राज्यभरात जिल्हा पोलीस दलाची नाचक्की होवून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच परिस्थितीत विधानसभा निवडणूक पार पडल्या. ईद ए मिलाद, जिल्हाभरातील रथोत्सव व सर्वात महत्वाचे म्हणजे अयोध्याचा निकाल यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे जिल्हा पोलीस दलासमोर आव्हान होते. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आव्हान पेलले आणि त्यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई ते अधिकार्यांपर्यंतच्या सर्वच यंत्रणाच्या परिश्रमातून विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. निवडणूक नव्हे तर अयोध्याचा निकाल, ईद ए मिलाद व रथोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या कामगिरीचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी विशेष कौतुक केले. पण या कौतुकासोबत आयजी दोरजे या पोलिसींग कशी असावी याबाबत शिपाई ते अधिकारी, अधीक्षकांना पाजलेल्या उपदेशांच्या डोसामुळे पोलीस दलाचे कौतुक केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही.
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्या परिस्थितीत जिल्ह्यातील अवैधधंदे बंद ठेवण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी महत्वूपर्ण निर्णय घेतले. मात्र काही दिवसांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले, एका पाठोपाठ घरफोड्या, दरोडा, खूनाच्या सलगच्या घटनांनी जिल्हा हादरला. त्यामुळे डॉ. उगले यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पोलिसाच्या सुमार कामगिरीबाबत माध्यमाधून टीका झाली. याच दरम्यान विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर होते. यात पोलीस अधीक्षकांनी आपल्यातील नेतृत्वगुणांचे दर्शन घडविले. निवडणूक तसेच गणेशोत्सव,नवरात्रोत्सव हे सण शांतते पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने दंड धोपटले. आणि डॉ. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली, सण उत्सवासह विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. याच काळात अयोध्या राम मंदिराचा निकाल, ईद ए मिलाद व रथोत्सव हेही शांततेत पार पडले. ज्या परिस्थितीत पोलीस दलाने कामगिरी पार पडली ती खरच कौतुकास्पद अशीच आहे. नेहमीचे टिकेचे धनी असलेल्या पोलिसांचे कधी कुणी कौतुक करत नाही. याचत विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी कामगिरीचे कौतुक केले. या कौतुकामुळे जिल्हा पोलीस दलाच्या गेल्या काळातील मेहनतीचे परिश्रमाचे फलीत झाले असे म्हणता येईल. यात महत्वाची भूमिका राहिली ती टिम लिडर म्हणून डॉ. उगले यांची हे नाकारुन चालणार नाही. चला असो, अधीक्षक उगले यांच्यासह त्यांच्या टीमचे अभिनंदन…
विशेष पोलीस महानिरिक्षकांनी कौतुक केले ही गोष्ट खरी पण त्यांनी, या कौतुकासोबत पोलिसिंग कशी असावी, आपण काय करतोय, आणि काय केल पाहिजे, याबाबत अधीक्षकांसह अधीकारी कर्मचार्यांना जे उपदेशही केले. एकवेळ त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण, गुन्ह्याचा तपास याबाबत कान टोचणे वेगळे मात्र पोलिसिंग कशी असावी याबाबत जर वरिष्ठ उपदेश करत असतील, तर ही जिल्हा पोलीस दलाचे नेतृत्व करत असलेल्या डॉ. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासाठी खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वरिष्ठ जेव्हा पोलिसिंगवर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा अधीक्षकांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, आपले कुठे चुकतेय हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. पोलिसिंगवर कारभार अवलंबून आहे. तीच नसेल कारभार सुस्थितीत आहे, असे म्हणजे कितपत बरोबर आहे. उत्कृष्ट कामगिरी केली, त्याचे कौतुक झाले, या आनंदावर आयजी दोरजे यांनी पोलिसिंगबाबत उपस्थित केलेले प्रश्न व उपदेशांमुळे विरजण पडले आहे. आगामी काळात उत्कृष्ट पोलिसिंगमुळे जिल्हा पोलीस दलाचे कौतुक व्हावे हे आव्हान आता पोलीस अधीक्षक डॉ.उगले यांच्यासमोर आहे. त्यासाठी उगले यांना साम, दाम, दंड, भेद या सर्व तत्वांना अनुसरुन काम करावे लागणार आहे. अधिकारी सांगतील तेवढेच काम करण्याइतपत कर्मचार्यांची झालेली मानसिकता बदलून त्यांनी स्वतःहून काम करावे, ही मानसिकता होणे गरजेचे आहे. सेनापतीवर सैन्य कसे आहे, हे ठरते. त्याप्रमाणे अधिकारीही खमक्या असला तर कर्मचारी आपोआपच कर्तव्यदक्ष असतील, व त्यांच्यातील उत्कृष्ट पोलिसिंग समोर येईल, याबाबतची दक्षता घेणे अपेक्षित आहे. पोलिसिंग उत्कृष्ट झाली तर आपोआपच कामगिरी उत्कृष्ट होईल यात तिळमात्र शंकाच नाही.