पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेकडून मोर्चा

0

पुणे- पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे बदली झाली असल्याचा आरोप करीत आज पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीच्या निषेधार्थ मनसेचा कोंढवा पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या मूक मोर्चाचे नेतृत्व मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केले. भाजपचे आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या भावावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्याऐवजी कर्तव्यदक्ष अधिकारी असलेल्या मिलिंद गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. हा भारतीय जनता पक्षाचा कुठला पारदर्शी कारभार आहे. आमदार योगेश टिळेकर यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे तो पूर्ण चौकशीअंती झाला आहे. त्याचे सर्व पुरावे पोलिसांकडे आहेत. असे असताना एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. ही निषेधार्थ बाब असून शासनाचा सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही काय असा सवाल मनसे गटनेते वसंत मोरे यांनी उपस्थित केला.