पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी यांचा मृतदेह नातेवाईकांनी घेतला ताब्यात

0

नाशिकला होणार अंत्यंस्कार ; शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद ; रिव्हॉल्व्हर जप्त

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी (58) यांनी गुरुवारी रात्री 12.30 वाजेनंतर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर कुटुंबियांना घटना कळताच त्यांनी हंबरडा फोडला. पहाटे या प्रकरणी धुळे शहर पोलिसात उपनिरीक्षक भरत काळे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर या घटनेत वापरण्यात आलेले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलिसांनी जप्त केले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गुरुवारी दुपारी नाशिक येथे मृत परदेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एका गोळीतच गेला बळी
मा.ध.पालेशा महाविद्यालयासमोरील पोलीस निवासस्थानात परदेशी हे पत्नी संगीता यांच्यासोबत असताना त्यांनी गोळी झाडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उजव्या कानपट्टीजवळ रिव्हॉल्व्हर लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले तर एकाच गोळीत त्यांचा मेंदूही बाहेर आला. नाशिक येथून ते बुधवारी सकाळी ते धुळ्यात आल्याचे सांगण्यात आले तर दिवसभर त्यांनी कामही केले शिवाय रात्री देवपूर आणि पारोळा रोड भागात त्यांनी रात्री पाहणी देखील केली होती़ कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर ते आपल्या धुळ्यातील शासकीय निवासस्थानी आले़

वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट
परदेशी यांनी पिस्तुलांतून गोळी झाडत आत्महत्या केल्याची बातमी मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह अन्य अधिकारी तात्काळ दाखल झाले़ रुग्णवाहिकेच्या मदतीने परदेशी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्यांना तपासून डॉ़ अरुणकुमार नागे यांनी मयत घोषीत केले़ हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून परदेशी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ तेथे सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा सिटीस्कॅन करण्यासाठी त्यांचा मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़ डोक्याचे सिटीस्कॅन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते़

जिल्हाभरात शोककळा
परदेशी यांनी धुळे नव्हे तर खान्देशातही सेवा बजावली असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. स्पोर्टस्मन असलेल्या अधिकार्‍याने आत्महत्या केल्याचा विश्‍वासही कुणालाही सुरुवातीला बसला नाही मात्र याबाबीची पुष्टी झाल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. परदेशी यांनी जळगाव जिल्ह्यात पहूर, निंभोरा, जळगाव गुन्हे शाखा, नंदुरबार शहर, मुंबई, जालना, धुळ्यातील देवपूर, आझादनगर आदी ठिकाणीही सेवा बजावली होती. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

दुपारी नाशिक येथे अंत्यसंस्कार
रमेशसिंह परदेशी यांच्या मृतदेहाचे गुरुवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले तर दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. नाशिकच्या इंदिरा नगर, आत्मविश्वास सोसायटी, जानकी अपार्टमेंट, रत्नचक्र चौक येथून त्यांची दुपारी अंत्ययात्रा निघणार आहे.