बारामती । बारामती उपविभागातील पोलीस पाटील भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला. विभागात बारामती तालुक्यात 72 व इंदापूर तालुक्यातील 48 उमेदवारांची निवड पोलीस पाटील पदासाठी झाली असून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या आधारावर राबविण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
येथील बारामती उपविभागीय कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी निकम बोलत होते. बारामती उपविभागातून पोलीस पाटील पदासाठी एकूण 800 उमेदवारांनी अर्ज केले होते. यामधून छाननीअंती 664 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यांपैकी लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण 607 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीसाठी पॅनलद्वारे घेण्यात आल्या. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, इंदापूर व बारामतीचे तहसिलदार, समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांचा समावेश होता. लेखी व तोंडी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणाद्वारे विभागातील 120 उमेदवारांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी निकम यांनी यावेळी दिली. पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये प्रशासनावर कोणत्याही लोकप्रतिनिधींचा दबाब नव्हता. सर्वकक्ष निकष लावून भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रांताधिकारी निकम यांनी सांगितले.