पोलीस पाटील संघटनेच्या विविध मागण्यांसाठी निवेदन

0

कर्जत : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेक ठिकाणी पोलीस पाटील संघटना एकत्रित झाल्या आहे. कर्जत पोलीस पाटील संघटनेने या मागण्या पावसाळी अधिवेशनात मान्य करण्यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांना निवेदन देऊन पुढाकार घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 20 फेब्रुवारी 2016 रोजी रेशीम बाग मैदान नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस पाटील यांचा राज्यव्यापी मेळावा घेण्यास आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर दोन महिन्यात निर्णय घेतो असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतर अनेक भेटी, निवेदने झाली परंतु अद्याप या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत.

प्रत्येक वेळी मिळाले फक्त आश्वासन
तसेच 30 नोव्हेंबर 2016 रोजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात मानधन वाढविण्याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तसेच संघटनेतर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून चर्चा केल्या आहेत. प्रत्येक वेळी आश्वासन दिली आहेत परंतु कार्यवाही होत नाही असे संघटनेने आमदार सुरेश लाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

सहनुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी
आपणच या आमच्या मागण्यांचा सहनुभूतीपूर्वक विचार करून विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या मागण्यांचा प्रश्न उपस्थित करून आमच्या मागण्या मान्य करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कर्जत पोलीस पाटील संघटनेने आमदार सुरेश लाड यांच्याकडे केली आहे. यावेळी कर्जत विभागीय अध्यक्ष विलास जाधव, नेरळ विभागीय अध्यक्ष पंकज घरत, सचिव शांताराम पाटील, मनोज पाटील, मधुकर डायरे, शेखर तरे, रामचंद्र गवळी, संजय हजारे आदी यावेळी उपस्थित होते.