आजपासून जवळपास 20 वर्षापुर्वी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती ही फक्त जिल्ह्याचा खर्या अर्थ्यांने विकास करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. मात्र आजही होती तीच परिस्थिती आहे. बहुदा त्याहीपेक्षा जास्त वाईट परिस्थिती आजची दिसत आहे. जिल्ह्याची भौगोलिक पारिस्थिती पाहाता उत्तरेस मध्यप्रदेश राज्याची सीमा तर पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. त्यामुळे अपराध्यांना खुपच फावते आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजमीतीस सगळ्या प्रकारचे अवैध व्यवसाय खुप जोमात सुरु आहेत. मात्र आज पावेतो पोलीस प्रशासनाकडून याला पायबंद घालण्यासाठी कोणत्याच उपाय योजना होतांना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
आज जिल्हाभरात जिकडे पहावे तिकडे सट्ट्याच्या दुकाने सर्रासपणे मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत, जिल्हाभरात पत्त्यांचे कलब राजरोसपणे सुरु आहेत, परराज्यातून दारुची सर्रास आवक-जावक सुरु आहे. रेशनमालाची चोरटी वाहतूक पोलीसांच्या संगनमताने होत आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली तंबाखु उत्पादने नंदुरबार जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक पानटपरीवर उपलब्ध होत आहे. पोलीसांच्या डोळ्या देखत अवैद्य प्रवासी वाहतूक होत आहे. जनतेसमोर पोलीसांना वाहतूकदांराकडून हप्ते गोळा करतांना दिसतात हे सगळे बघून जनसामान्यात हा प्रश्न नक्की उभा रहातो की पोलीसांवर भरोसा करायचा तरी कसा. कारण ह्या सगळ्या अवैध व्यवसायांसाठी पोलीसच जबाबदार आहेत. प्रत्येक शहरात वेश्या व्यवसायही जोरात आहे.
जिकडे तिकडे सट्ट्याचा महापूर
आज जिकडे पहावा तिकडे सट्टा व्यवसाय करणार्यांचा महापूर वाहतो आहे. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्ली बोळात सट्ट्यांचा व्यवसाय अगदी राजरोसपणे सुरु आहे. पोलीसांना मोठा हप्ता ह्यामधून मिळतो आहे. आज पावेतो हा व्यवसाय दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस कोणताच अधिकारी बंद करु शकलेला नाही. हा व्यवसाय बंद करु शकणारा अधिकारी नंदुरबार जिल्ह्याला मिळू शकलेला नाही हे मोठे दुर्देव आहे. नंदुरबार जिल्ह्याला अजूनही एकही कर्तव्यदक्ष अधिकारी नाही. कारण ह्या सट्टा व्यवसायामुळे अनेक परिवार देशोधडीला लागले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधव हे अशिक्षीत असल्याने ते समजा सट्टयाचे शौकीन असू शकतो, मात्र आता तर सुशिक्षीत लोकही एवढे व्यसनाधीन होतांना दिसत आहेत. अनेक शासकीय कर्मचारी सुद्धा त्या सट्टयाच्या लोभाला बळी पडतांना दिसत आहेत. तोच प्रकार पत्त्यांच्या कलबच्या बाबतीत नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आज पत्त्यांचे कलब सुरु आहेत. पत्ते खेळण्यासाठी गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातून सुद्धा अनेक खेळाडू येत असतात. एका कलब चालकाकडून पोलीस विभागाला जवळपास 50 हजार रुपयांचा हप्ता पोहोचवला जातो. त्यामुळे पोलीस प्रशासन फक्त थातुर मातूर कारवाई करण्याव्यतिरिक्त काहीच करत नाहीत. ह्या पत्त्यांच्या नादात अनेक संसार बर्बाद झालेले आहेत. ह्यासगळ्या परिवारांच्या बरबादीस पोलीसांनाच जबाबदार धरावयास हवे. मध्यप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणावर नकली दारु बनवली जाते आणि ती इतर राज्यात पोहोचवली जाते. आज गुजरात राज्यात दारुबंदी आहे. मात्र, मध्यप्रदेशातून येणारी अवैध दारु (मद्य) हे नंदुरबार जिल्ह्यातूनच गुजरात राज्यात जात असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हे नकली मद्य मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यामुळे शासनाचे अबकारी कराचे मोठे नुकसान होते. त्यावर पोलीस प्रशासनाने अंकुश बसविल्यास शासनाचा मोठा फायदा होऊ शकतो. मात्र इथेही पोलीस प्रशासनाची मानसिकता फक्त स्वतःचे पोट भरण्याची आहे. आज नंदुरबार जिल्ह्यात परमीट, रुम, बिअरबार पेक्षा रस्त्यावरील ढाब्यांवरच मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारु विक्री होत आहे. पोलीस विभाग डोळे झाकून हे सगळे बघत आहे. 5 ते 10 हजाराचा हप्ता पोलीसांना ह्या ढाब्यांवरुन मिळतो. म्हणून ह्याकडे दुर्लक्ष केले जात असते.
रेशन माल जातो परराज्यात
गरीबांसाठी येणारा रेशन माल काळा बाजारात जात आहे आणि नंदुरबार जिल्ळ्यांचे नाव कुपोषणाबद्दल संपूर्ण जगात ‘कुपोषित जिल्हा’ म्हणून ओळखले जात आहे. वास्तविक पहाता शासन मोठ्या प्रमाणावर अन्न, धान्य ह्या जिल्ह्यात पाठविले. मात्र रेशन माफीयांमुळे हा याचा हक्काचा धान्य-पुरवठा शासकीय बाबुंच्या संगतमतामूळे काळ्या बाजारात म्हणजे मध्येप्रदेश, गुजरात राज्यात पोहोचविला जातो आहे. गरीबांना मोलमजूरीसाठी गुजरात, सोलापूर कडे मजूरीसाठी जावे लागते आणि यामुळे इकडे मात्र कुपोषण वाढते आहे. वेळीच यावर प्रतिबंध होणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी ह्या बाबीकडे लक्ष घालाव्यास हवे मात्र ते ही काहीस करत नाही गरीबांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन देणारी यंत्रणाच आज मितीस कोलमडून पडली आहे. त्यामुळे ह्या रेशन मालाची तस्करी करणार्यांचे फावते आहे.
अवैध प्रवाशी वाहतूकीचा महापूर
संपूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत असूनही पोलीस प्रशासन डोळे झाकून बघण्यापलीकडे काही करत नाही. प्रवाशांच्या जिवीताशी सर्रासपणे खेळ होत आहे. पोलीस प्रशासन आणि आर.टी.ओ. विभागाकडून कोणतीच कारवाई होतांना जनतेने बघीतलेली नाही. शहादा ते धडगाव, शिरपूर, नंदुरबार ते तळोदा, अक्कलकुवा ते धडगाव, नंदुरबार ते नवापूर अश्या मार्गांवर अगदी पोलीसां समक्ष हजारो वाहने अवैध प्रवासी वाहतूक करतात ह्यात सगळेच सामिल असतात. ह्यामुळे एस.टी. महामंडळाचे अतिनात नुकसान होत आहे. मागे तर असे पाहण्यात आले होते. की एका प्रवासी वाहनात महेंद्र बोलेरो मध्ये जवळपास 42 प्रवासी कोंबुन धडगाव सारख्या घाटात आर.टी.ओ. विभागाने ह्या वाहने अडवले असते प्रवासी संख्या मोजल्यावर आर.टी.ओच्या निरीक्षकाने तोंडात बोटे घातली होती. कधी जागे होणार हे पोलीस प्रशासन आणि कधी ह्या जिल्ह्यात सुशासन येणार हेच कळत नाही.
वेश्या व्यवसायाला दलालांकडून मिळते चालना
आंबटशौकीनांचे शौक पुरे करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय चालविण्यात येतो. वेश्या व्यवसायाला उत्तेजन देणारे अनेक दलाल शहार्यात निर्माण झालेले आहेत. शहादा शहराची प्रचिती वेश्याव्यवसायाबद्दल गुजरात राज्यापर्यत पोहोचली आहे कारण ह्या दिवसात गुजरात राज्यातून शहादेशहरात अनेक आंबट शौकीन येऊन त्यांची हौस पुर्ण करतात किती बदनामी होते आहे. शहादा शहराची ह्याचा कधी पोलीसांंनी विचार केला काय? पोलीसांनी केलेल्या कारवाई जवळपास 80 महिलांना हा व्यवसाय करतांना पोलीसांनी पकडले त्यात 5 मुली होत्या. हे सगळे नंदुरबार जिल्ह्यात अगदी राजसोसपणे सुरु आहे तेव्हा सामान्य नगरीक तर हाच विचार करतात की पोलीस प्रशासन ह्या सगळ्या प्रकारच्या अवैध व्यवसायात सामिल आहेत किंवा त्यांच्या संगनमताशिवाय कोणाचीच एवढीमोठी हिमत होणार नाही.
अवैध धंद्यावर कारवाईची नागरीकांकडून मागणी
ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास एक गोष्टमात्र नक्की हे सगळे व्यवसाय येथील नागरिकांना अपराध करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत आज जिल्ह्यात घरफोड्या, मंगलपोत खेचण्यासारखे प्रकार सर्रास होत आहेत कारण पोलीसांचा वचक राहिलेला नाही. अनेक अपराधी तर एवढे निर्ढावले आहेत की बातमीदारांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना धमकावत असतात कारण त्यांचे हे अपराध जनता आणि प्रशासनासमोर उघड करण्याचे कर्तव्य हे बातमीदार करीत असतात आता हयाबद्दल प्रशासनाने काय ती योग्य भुमिका घेऊन जिल्ह्यात बदनाम होण्यापासून वाचवावे हीच अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.
भरत शर्मा, नंदुरबार – 9156293031